शतकोत्तर वणी नगर परिषदेचे बदलते स्वरुप

नगराध्यक्षांचे शाही पदग्रहण पण गतवैभवाचे काय?

श्रीवल्लभ के. सरमोकदम: देशाचे, राज्याचे राजकारण वेगळे असते. त्या पातळीवरच्या समस्याही निराळ्या असतात. राष्ट्र,आंतरराष्ट्रीय दृष्टीकोण त्यामागे असतो. त्यामूळे कोणत्याही राज्य वा राष्ट्राच्या प्रमुखाचा शपथविधी जाहीरपणे जनतेच्या साक्षीने होण्याची प्रथा पूर्वी पासून आजतागायत सुरु आहे. परंतू एखादे गांव किंवा नगराच्या पातळीवर अशी घटना नाविन्यपूर्णच ठरते. अन् ती वणी शहरात होवू घातली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा पदग्रहण समारोह मोठ्या थाटात अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत जणू वाजत गाजत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वातंत्र्य लढ्याची साक्षिदार असलेली, शंभर वर्षे पूर्ण केलेली नगर परिषद आता आपल्या बदलत्या स्वरुपाची साक्षिदार ठरणार आहे. वणीत प्रथमच अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत शाही थाटात सोमवार दि.१२ जानेवारी रोजी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा पदग्रहण समारोह होणार आहे. परंतू इतिहासाची पाने पुसून नवा इतिहास घडवताना, शहराचा वारसा न विसरता वणीकरांच्या कसोटीवर खरे उतरण्याचे आव्हान सत्ताधार्‍यांसमोर आहे.

दि.१६ जानेवारी १९२४ रोजी इंग्रज काळात स्थापन झालेल्या वणी नगर परिषदेला शंभर वर्षे पूर्ण झाली. पूर्णतः दगडी बांधकाम असलेली ही इमारत अत्यंत देखणी आहे. स्वातंत्र्य लढ्याची ती केवळ साक्षिदार नसून अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अगदी इंग्रज काळापासून या स्थानिक स्वराज्य संस्थेचे पर्यायाने शहराचे नेतृत्व केले आहे. त्यामूळे वणीकरांसाठी तो एक ठेवा आहे.

पुर्वीपासूनच अत्यंत सधन व समृद्ध नगराची ही मायबाप संस्था आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख दीर्घ काळापर्यंत जोपासून होती.त्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर होती. पण मागिल सुमारे तिन दशकांपासून या मायबाप संस्थेची प्रतिष्ठा या ना त्या कारणाने काळवंडल्या गेली. ज्या माणसांच्या नावाने या शहराची,नगर परिषदेची ओळख होती ती तर संपुष्टात आलीच आहे पण त्या उंचीची एकही व्यक्ती गेल्या काही वर्षांत पालिकेच्या चिरेबंदी इमारतीने बघितली नाही. उलटपक्षी नगराध्यक्षांवर फौजदारी दाखल झाल्याचे या शहराने अनुभवले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एवढेच नव्हे तर शहराला ओळख देणार्‍या अगदी प्रथम नगराध्यक्षांपासून वर्तमानातील नगराध्यक्षांचा कार्यकाळ दर्शवणारा फलक काढून फेकण्याचा करंटेपणा करण्यात आला.हा प्रकार म्हणजे शहराचा इतिहास पुसण्याचा प्रकार ठरला असून त्याचे साधे वैषम्य आजपर्यंत कुणालाच नाही.

देशात व महाराष्ट्रात गेली काही वर्षे सातत्याने भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आहे. वणी नगर परिषदेचा मागिल कार्यकाळ भाजपाच्याच हातात होता. त्यामूळे गेल्या सात आठ वर्षांत वणी शहराचा चेहरा पूर्णतः बदलला खरा पण शहराविषयी आस्था,दूरदृष्टी या बाबींचा अभावच दिसून आला. मागिल कार्यकाळात भाजपाकडे संपूर्ण सत्ता होती. सभागृहात विरोधकच नव्हते. सत्ताधार्‍यांकडे तब्बल २३ नगरसेवक होते. त्यामूळे सत्ताधार्‍यांचा एकछत्री अंमल होता.परंतू नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पूर्व पुण्याईच्या भरवशावर भाजपला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापीत करता आले आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा धडा घेत वणीकरांनी नगर परिषद निवडणुकीत व्यावहारीक निर्णय घेतल्याचेही त्यातून स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीचा निकाल म्हणजे वणीकरांनी भाजपवर टाकलेला विश्वास आणि अपेक्षांचे ओझे असल्याचेही सर्वश्रुत आहे.पण आता या विश्वासाला तडा जाणार नाही अन् अपेक्षेचे रुपांतर उपेक्षेत होणार नाही, यासाठी नगर परिषदेसह भाजपच्या धुरिणांनाही कंबर कसावी लागणार आहे.

कोणत्याही सत्तेवर आरुढ होताना त्याचा पूर्व इतिहास,तत्संबधीचा वारसा,भविष्यातील आव्हाने याचे यथायोग्य आकलन झाल्यास ती सत्ता कमी जोखमीची ठरते. त्याची प्रतिष्ठा वृद्धींगतच होते.जोडीला भविष्याचा वेध घेता आला तर त्यात मोलाची भर पडते. या सर्वांची मोट बांधताना भाजपसह नवनिर्वाचीत नगराध्यक्ष व सभागृहातील शिलेदार याचे भान राखणार की नाही हे पुढील काळात कळेलच.

विशेष म्हणजे माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी या सर्व नवनिर्वाचीत पदाधिकार्‍यांचा शाही पदग्रहण समारंभ होत आहे. त्यामूळे या महापुरुषांना स्मरुन त्यांची वाटचाल सुरु होत असल्याने हाच मार्ग ते पुढील पाच वर्षे अंगिकारण्याची अपेक्षा आहे. तूर्तास नगर परिषदेच्या सर्व नवनिर्वाचीत धुरिणांना पुढील वाटचालीसाठी समस्त वणीकरांच्या वतीने शुभेच्छा!

Comments are closed.