विवेक तोटेवार, वणी: केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला होता. परंतु हा अविश्वास प्रस्ताव सपशेल फेल ठरल्याने महागठबंधन तोंडघशी पडले. संसदेत मोदी सरकारवर ठेवलेल्या विश्वासाबाबत आज वणीत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.
संपूर्ण भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागलेल्या हा अविश्वास ठराव होता. संसदेत तब्बल 11 तास चर्चा चालल्यानंतर 320 संसद सदस्यांनी मोदी सरकारच्या बाजूने मत दिले. लोकशाहीच्या इतिहासात सर्वात मोठे उत्तर या मोदी सरकारने विरोधकांना दिल्याचा आनंद भाजपने साजरा केला.
वणीत नगर परिषद आणि विधानसभेत भाजपच सत्तेवर आहे. भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टिळक चौकात जोरदार आतषबाजी केली. मिठाईचे वाटप केले. या प्रसंगी वणीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील सूर, संजय पिंपळशेंडे व भाजपचे नगर परिषदेचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष म्हणाले की, कॉंग्रेसने जे महागठबंधन तयार केले ते पूर्णपणे फेल ठरले. मोदी सरकारने आपली ताकद पुन्हा जगापुढे दाखविली आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, लोकशाहीच्या इतिहासात विरोधकांना सर्वात मोठे उत्तर मोदी सरकारने दिले आहे. त्याचा आनंद सोहळा आज भारतीय जनता पक्षाने साजरा केला.