मांगलीतील अंध तरुणाच्या जीवनात आला प्रकाश

मंगेश पाचभाई यांच्या प्रयत्नामुळे कैलासला मिळाली दृष्टी, 'वणी बहुगुणी'ने समोर आणली होती कैलासची व्यथा

सुशील ओझा, झरी: एक वर्षांपूर्वी घरातील कर्त्या व्यक्तीवर अचानक अंधत्व आल्यामुळे मांगलीतील टेकाम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्याला उपचासाठी दाखल केले व आज ती व्यक्ती जग पाहू शकत आहे. ‘वणी बहुगुणी’ने ही व्यथा सर्वांसमोर आणली होती व मदतीचे आवाहन केले होते.

तालुक्यातील मांगली येथील रहिवासी असलेला 26 वर्षीय कैलास टेकाम हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा. मात्र एक वर्षांपूर्वी कैलासची अचानक दृष्टी गेली. कैलासच्या वडीलांची दृष्टी देखील अधू आहे. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी कैलासच्या आईवर आली. कैलासची आई मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

कैलासबाबतची ही माहिती अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांना कळाली. त्यांनी मांगली येथे जाऊन कैलासच्या कुटुंबीयांची भेट घेतली व कैलासला उपचारासाठी सावंगी मेघे नेले. तिथे डॉक्टरांनी कैलासला तपासून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. तिथे कैलासवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनतर कैलासची दृष्टी परत आली आहे.

कैलासला सावंगी येथील रुग्णालयातून मंगळवारी 7 सप्टेंबरला सुट्टी मिळाली आहे. कैलास यांनी रूग्णालयात सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे, मंगेश पाचभाई व त्यांचे सहकारी मित्र यांचे आभार मानले. या कामात मंगेश पाचभाई यांनी पुढाकार घेतल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. याआधीही विविध सामाजिक उपक्रम मंगेश पाचभाई यांच्याद्वारे परिसरात राबवण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

भालरच्या जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

सहकार क्षेत्र ही विकासाची चावी: देविदास काळे

Comments are closed.