चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू

एकाच रात्री तीन चोऱ्या, सव्वादोन लाखांहून अधिक माल लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख 33 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून धरफोडी, चोरी आणि अन्य गुन्ह्यांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिक घास्तावले आहेत. गुरुनाथ सखाराम पिदूरकर हे जैन लेआऊट परिसरात राहतात. वेकोलित कार्यरत सुरेंद्र मुरय्या कल्लुरी हे पिदूरकर यांच्या घरी गेल्या काही महिन्यांपासून भाड्याने राहतात. सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी भाडेकरू सुरेंद्र कल्लुरी यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. कपाटातील 1 लाख 35 हजार रूपये किमतीची सोन्याची पोत व रोख 65 हजार रूपये लंपास केलेत.

त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा घरमालक असलेले गुरुनाथ पिदूरकर यांच्याकडे वळविला. घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील चांदीची अत्तरदाणी, चांदीची वाटी, चांदीचे चमचे व रोख 7 हजार रूपये, असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना उजेडात आल्यानंतर यासंदर्भात वणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी कलम 331(4), 305 (अ) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.

*एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या*

एकाच रात्री तीन चोऱ्या होणं ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. जैन लेआऊटमध्ये कल्लुरी आणि पिदुरकर यांच्या घरी चोरी झाली. त्याच रात्री वणीच्या एमआयडीसीत असलेल्या गजानन फर्निचरही चोरट्यांनी साफ केले. हे दुकान नेहमीच वर्दळ असलेल्या जागेवर व रस्त्यावर आहे. चोरट्यांनी या दुकानातून 8 हजार रूपये किमतीची वेल्डिंग मशीन, 500 रूपये किमतीचा इलेक्ट्रिक बोर्ड, 6 हजार रूपये किमतीचा ग्राईंडर, 4 हजार रूपये किमतीची स्क्रू फिटिंगची मशीन लांबवली.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.