लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास, पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

दिराने उचलला हात, नांदवायसाठी 5 लाखांचा मागितला हुंडा

बहुगुणी डेस्क, वणी: एका विवाहित तरुणीला लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यातच सासुरवास सुरु झाला. सासरच्या मंडळींनी 5 लाखांची मागणी केली. मात्र वडील गरीब असल्याने पत्नीने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे पतीने पत्नीला माहेरी आणून सोडले. याबाबत पत्नीने पतीविरोधात तक्रार केली होती. मात्र पती पत्नीत कोणताही समेट न झाल्याने पतीसह सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी विवाहित तरुणी पूजा (बदललेल नाव) ही 21 वर्षांची असून ती राजूर येथील रहिवासी आहे. तिचे 18 फेब्रुवारी 2025 रोजी बल्लारशाह येथील रहिवासी असलेल्या एका 25 वर्षीय तरुणासोबत रितिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. तिच्या पतीचे एकत्र कुटुंब आहे. बल्लारशाह येथील घरी तिचा पती, सासु, सासरे, दिर असे राहतात. तर तिची ननंद ही घराशेजारी राहते. लग्नानंतर दोन महिने सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र नंतर तिचा पती दारू पिऊन घरी यायचा व तिला मारझोड करायचा. याबाबत तिने सासरच्या मंडळींकडे तक्रार केली असता ते देखील तिला त्रास द्यायचे.

दिनांक 22 एप्रिल रोजी पूजाचे पती व दिर सकाळी नाष्टा केल्यानंतर खर्रा खाण्यासाठी पानटपरीवर गेले. मात्र घरी केवळ तिचा दिर परतला. यावर पूजाने पती कुठे आहे अशी दिराकडे विचारणा केली. मात्र दिराने पूजाच्या गालावर थापड मारली. दिर वहिनीवर हात उगारतो ही गोष्ट पूजाने खपवून घेतली नाही. तिने दिराच्या नावाने पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला. दुपारी 1 वाजता तिचे पती घरी आले. त्याने पूजाला तू रिपोर्ट का दिला असा जाब विचारत तिला मारहाण केली. या मारहाणीत सासरचे मंडळी देखील सामील झालेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तू आता घरी राहायचे नाही, घरी राहायचे असेल तर तुझ्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेऊन ये, अशी अट सासरच्या मंडळींनी पूजापुढे ठेवली. मात्र तिने वडिलांकडे इतके पैसे नाही असे सांगत पैसे आणण्यास नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला राजूर येथे माहेरी आणून सोडले. 29 एप्रिल रोजी पूजाने मारहाण व हुंडा मागितल्याच्या कारणावरून वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सदर प्रकरण पांढरकवडा येथील महिला समेट कक्षाकडे गेले. मात्र तीन बैठकीत तिथे कोणताही समेट होऊ शकला नाही. तिच्या पतीने पूजाला घरी नांदवायला नकार दिला.

अखेर कोणताही समेट न झाल्याने पोलिसांनी बल्लारशाह येथील रहिवासी असलेले पतीसह सासू, सासरे, ननंद, दिर यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 85 व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.