शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात
ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
जितेंद्र कोठारी, वणी: रानडुकराने एका शेतक-यावर हल्ला केला. हल्ल्यात शेतक-याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. तिथे त्याच्या हातावर टाके मारण्यात आले. मात्र एक्सरे मध्ये हातात डुकराचा दात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकाराने ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या प्रकारामुळे घाबरलेल्या रुग्णाने शहरातील एका खासगी रुग्णालयाची वाट धरली व तिथे त्याने पुढील उपचार घेतला.
सविस्तर वृत्त असे की शेतकरी पवन देविदास खिरटकर (30) हा निवली येथील रहिवाशी आहे. हा शुक्रवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी त्याच्या मुलासह गावालगत सकाळी 11 वाजताच्या सुमारास शेतात जात होता. दरम्यान गावालगत असलेल्या ताजणे यांच्या शेतात त्यांच्यावर एका रानडुकराने हल्ला केला. त्या हल्यात पवनच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
जखणी पवनला वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आला. जखमेवर टाके मारण्यात आले. दुपारी 4 वाजताच्या सुमारास हाताला काही फ्रॅक्चर आहे हे बघण्यासाठी पवनच्या हाताचा एक्सरे काढण्यात आला. एक्सरेत डॉक्टरांना एक हाड सदृष्य तुकडा आढळून आला.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टारांनी पवनला तीन दिवसांनी टाके उघडून तुकडा काढू असे सांगितले. मात्र तिथला सावळागोंधळ पाहून पवनचे नातेवाईक भयभीत झाले. नातेवाईकांनी पवनला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. खासगी रुग्णालयात पुन्हा एक्सरे काढण्यात आला. तिथे त्यांना चक्क डुकराचा दात आढळून आला.
सध्या पवन यांची प्रकृती चांगली आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा या प्रकारामुळे पुढे आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हे देखील वाचा:
मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
Comments are closed.