कार्यालयीन वेळेतच कर्मचा-याचा वाढदिवस साजरा
कर्मचा-यांची वाट बघून अखेर कामासाठी आलेले परतले घरी
विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषद कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय बनलेला असते. मंगळवारी दुपारी नियोजन विभागातील एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. हा वाढदिवस कार्यालयीन वेळेतच साजरा करण्यात आल्याने सुमारे पाऊन ते एक तास भर काम बंद होते. शिवाय या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन केले गेले नसल्याने नगर पालिकेने केवळ सर्वसामान्यांनाच याबाबत सल्ला द्यावा व दंड आकारावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर परिषदेचा कार्यालयीन वेळ हा सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा पर्यंत आहे. या वेळेत दुपारी 1 तासांची जेवणाची सुट्टी असते. मंगळवारी 21 जुलै रोजी नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याचा वाढदिवस होता. कार्यालयात सहकार्याचे वाढदिवस साजरा करणे यात काही गैर नाही. खासगी कार्यालयानंतर आता सरकारी कार्यालयातही सहकरी कर्मचा-यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र हा वाढदिवस लंच ब्रेकमध्ये साजरा न करता दुपारी 4 वाजताच्या सुमारास कार्यालयीन वेळेतच सुरू झाला. त्यामुळे या वेळेत कार्यालयीन काम बंद होते.
हा वाढदिवस नगर परिषदेच्या इमारतीत साजरा करण्यात आला. यावेळी अनेक नागरिक नगर परिषदेत आपल्या काही कामाकरिता कार्यालयात कर्मचारी येण्याची वाट पाहत होते. परंतु त्यांनी घेतलेल्या अनधिकृत ब्रेकमुळे त्यांच्या पदरी निराशाच आली. जेव्हा हे कर्मचारी परत आले तेव्हा कार्यालयीन कामासाठी आलेले अधिकाधिक निघून गेले होते. महत्वाचे म्हणजे हा सर्व प्रकार मुख्याधिकारी कार्यालयात हजर असताना घडला आहे.
नगर परिषदेचे कर्मचारी हे सध्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यात गुंतलेले आहेत. कोरोनामुळे शहरात जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या खांद्याला खांदा लावून नगर पालिका काम करते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नसल्याने नगर पालिकेने अनेक व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र नगर पालिकेतच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत वाढदिवस साजरा केला जात असले. तर मग सामान्य नागरिकांनी असे नियम का पाळावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.