चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नेत्यांचा आसरा

ग्रामपंचायत निवडणुकीत बॅनरवर झळकले पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री व आमदार

0

रवि ढुमणे, वणी: वणी तालुक्याचे लक्ष लागलेल्या चिखलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांगीण विकास पॅनलने चक्क पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार फलकावर झळकावीत मते मागण्यासाठी आसराच घेतला आहे. सोबतच सबका साथ सबका विकास हा नारा घेत दुपट्यावर कमळाचे फुल सुद्धा झळकले आहे.  यावरून चिखलगावची निवडणूक स्वतःच्या जोरावर की पार्टीच्या भरवश्यावर असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तालुक्यातील सर्वात मोठी तसेच, जिल्ह्यात मॉडेल ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.  गेल्या १५ वर्षात एकाकी सत्ता काबीज करत गावाचा विकास करून मॉडेल ग्रामपंचायत म्हणून चिखलगाव चे नाव अग्रस्थानी ठेवणारे सरपंच सुनील कातकडे हे ग्रामविकास क्रांती पॅनल च्या नावावर निवडणूक लढवीत आहे.

यावेळी सुनील कातकडे यांनी १५ वर्षे ग्रामपंचायत ला वेळ देऊन गावातील समस्यांचे निराकरण करीत चिखलगाव ग्रामपंचायत मॉडेल म्हणून उदयास आणली आहे. सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने त्यांनी माजी उपसरपंच असलेल्या अनिल पेंदोर यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिली आहे. गावात विकासाच्या माध्यमातून असलेली पकड आणि अनुभवी उमेदवार देऊन या निवडणुकीत जणू कंबर कसली आहे.

दुसरीकडे भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांनी सर्वांगीण विकास पॅनल तयार करीत भाजपच्या नेत्यांचे फोटो फलकावर झळकवीत जणू ही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवीत असल्याचा प्रकार येथे केलेला आहे. चिखलगावात स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढविण्याचे सोडून “सबका साथ सबका विकास ” हा भाजपाचा नारा घेऊन फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आणि सोबत विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे फोटो लावले आहेत. इतकेच नव्हे तर भाजपाच्या कमळ या चिन्हाचा दुपट्यावर वापर करण्यात आला आहे. सध्या आदर्श आचार संहिता सुरू आहे. तरीसुद्धा पक्षाच्या नावाचा उदोउदो करीत ही निवडणूक पक्षाच्या नावावर जिंकण्याची धडपड सर्वांगीण विकास पॅनल ने केली आहे.

स्थानिक गावातील निवडणूक असताना नेत्यांचे म्हणजेच चक्क पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे फोटो लावून गाव ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न चालविला आहे.
मागील कार्यकाळ बघितला तर सुनील कातकडे यांनी एकाकी सत्ता उपभोगली आहे.  केवळ विकासाच्या बळावर त्यांची याही वेळी आगेकूच सुरू आहे. फलकावर कोणत्याही नेत्यांचे अथवा पक्षाचे फोटो न लावता स्वबळावर गावातील निवडणूक लढविण्याचा मानस त्यांच्या असल्याचे यावरून दिसत आहे.

येत्या ७ तारखेला तालुक्याचे लक्ष लागलेल्या चिखलगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा पोळा फुटणार आहे. मात्र सध्यातरी ही निवडणूक सर्वांच्या प्रतिष्ठेची बनली आहे.  इतर उमेदवार सुद्धा जंगजंग पछाडून सरपंच पदाच्या शर्यतीत आहेत. चिखलगाव चा खरा सामना आता रंगायला सुरुवात झाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.