डोळा निकामी झालेल्या कामगाराला अखेर न्याय

विनोद जंगीलवारवर हैद्राबाद येथे शस्त्रक्रिया

0 457
सुशील ओझा, झरी: विनोद जंगीलवार या तरुण कामगाराला अखेर न्याय मिळाला आहे. फॅक्ट्रीत काम करताना त्याचा डोळा निकामी झाला होता. कामगार कायद्यानुसार त्याला कंपनीकडून योग्य तो उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र कंपनीने या कामगाराकडे सपशेल दुर्लक्ष केले होते. अखेर ‘वणी बहुगुणी’ने हा मुद्दा उचलताच कंपनीला जाग आली आणि आता या मजुरावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
डिलाईट कंपनीत मुकुटबन येथील विनोद राजेश्वर जंगीलवार (३१) हा गेल्या तीन वर्षांपासून गणेशपूर शिवारात असलेल्या डिलाईट केमिकल प्रा. लिमिटेड या कंपनीत काम करीत होता. अनेक वर्षांपासून कंपनीत चुना तयार करण्याचे काम केले जाते. या कंपनीमध्ये परिसरासह बाहेरील जवळपास शंभरच्यावर मजूर कार्यरत आहे. १० ऑक्टोबरला रात्री कंपनीत काम करीत असताना ११.३० च्या सुमारास पॅकिंग मशीनचा दाब वाढल्याने चुन्याची बॅग फुटून त्याच्या उजव्या डोळ्यात गेला. यामुळे जंगीलवार यांचा डोळा निकामी झाला.
कंपनीने जंगीलवारला प्रथम वणी व त्यानंतर सेवाग्राम येथील दवाखान्यात पाठविले. परंतु कोणतेही उपयोग झाले नाही. कंपनी पीडित मजुराला नियमाने जी मदत मिळायला हवी, ती न देता धुडकाविणे सुरू केले. जंगीलवार हा अतिशय गरीब असून त्याची हलाखीची परिस्थिती आहे. या घटनेला तीन महिने लोटूनही कंपनीच्या वरिष्ठांनी साधी विचारपूससुद्धा केली नाही. अखेर कंपनीच्या मॅनेजर शुक्ला यांच्याजवळ ९ व १८ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार करण्यात आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता नियमाने मिळणारी मदत द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु कंपनीकडून सदर तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
जंगीलवार यांनी मदत मिळावी, यासाठी मुकुटबनचे सरपंच शंकर लाकडे गणेशपूरचे संतोष बरडे, सुशील ओझा, यांच्यासह जंगीलवार यांचे नातेवाईक शुक्ला यांना भेटले. मजुराला मदत देण्याची विनंती केली. त्यावेळी १५ दिवसांच्या आत सदर मजुराच्या विम्याचे, नोकरीचे तसेच नियमाने जी आर्थिक मदत होईल, ती देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप मदत मिळाली नाही. कंपनीने मजुराचा विमाच काढला नसल्याची बाब समोर आली. पीडिताच्या शरीराचा मुख्य अवयव निकामी झाल्याने त्याला धोका निर्माण झाला. तसेच त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिवार्हाचा प्रश्न उपस्थित झाला. .
कंपनी नियम डावलून जीविताशी खेळत असल्याचा आरोप करीत उपोषण करण्याचा इशारा मजुराने दिला होता. मात्र त्यानंतरही कंपनीने डोळेझाक केली. हा प्रकार ‘वणी बहुगुणी’ला माहीत होताच वृत्तमालिकेच्या माध्यमातून कंपनीचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यात आला. त्यानंतर कंपनीचे धाबे दणाणले. त्यांनी मजुरावर हैद्राबाद येथील खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया केली. त्यामुळे मजुराला दृष्टी येईल, अशी शक्यता आहे. आता मजुराला आर्थिक मदतीची अपेक्षा असून, कंपनीने ती त्वरित द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Loading...