जितेंद्र कोठारी, वणी: येथील रंगनाथ नगर भागात आपल्या आजीकडे असलेली एक अल्पवयीन तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तरुणीचा काही पत्ता लागला नाही. अखेर बेपत्ता तरुणीच्या आत्याने वणी पोलीस स्टेशनमध्ये सदर तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
प्राप्त माहितीनुसार बेपत्ता झालेल्या तरुणीला आई-वडील नाहीत. भाऊ आणि एक बहीणी सोबत ही 16 वर्षीय तरुणी रंगनाथनगरमध्ये आपल्या आजीकडे राहत होती. तसेच येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दि.14 ऑक्टो. बुधवारी आत्याकडे जाते म्हणून तरुणी घरून निघाली. मात्र ती आत्याच्या घरी पोहचलीच नाही. कुटुंबियांनी इकडे-तिकडे चौकशी केली.
तरुणीचा काही थांगपत्ता लागला नाही. तेव्हा मुलीच्या आत्याने पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास स.पो.नि. निखील फटींग करीत आहे.
मागील काही काळापासून वणी परिसरातून अल्पवयीन तरुणी बेपत्ता होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. गरीब कुटुंबातील मुलींना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेणारी गॅंग सक्रिय असल्याचे बोलले जाते. तर प्रेमसंबंधामुळे काही मुली कुटुंबियांना न सांगता घर सोडून निघून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)