ही माती लय भारी, घडवतेय अधिकारी

वणीचं शासकीय मैदान ठरतंय अनेकांना प्रेरणादायी

0

विलास ताजने, वणी: मातीत घाम जिरवल्याशिवाय यशाचं पीक येत नाही. नव्या पिढीतील धडपडणाऱ्यांसाठी शासकीय मैदानाची माती ‘लय भारी’ ठरत आहे. या मैदानावर अथक मेहनत घेऊन अनेक अधिकारी घडत आहेत. स्पर्धापरीक्षांच्या थेरॉटिकल अभ्यास आवश्यक आहे.

त्यासोबतच काही पदांकरिता प्रॅक्टिकल कसरतही तेवढीच गरजेची आहे. पोलीस, सैन्य, संरक्षण अशा नोकरींकरिता याच मैदानावर विद्यार्थी घडत आहेत. प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनात युवक याच मैदानात नव्या स्वप्नांची पेरणी करीत आहेत.

आजच्या घडीला परिस्थिती चांगली असणारे तरुण बुद्धिमत्तेसह आर्थिक सुबत्तेच्या बळावर डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या तरुणांत बुद्धिमत्ता असूनही शक्य होत नाही.

मग बुद्धीमत्तेसह शारीरिक सुदृढता अंगी असणारे तरुण देशसेवेच स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नांनी पराकाष्ठा करतात. बुद्धीला चिकाटीची जोड मिळाली, की त्यात ते यशस्वी होतात. स्वकष्टावर, स्वबळावर मिळवलेल्या गोष्टी जीवनात असीम आनंद मिळवून देते. अर्थातच यासाठी वणीचं शासकीय मैदान तरुणांना प्रेरणादायी ठरत आहेत.

वणीच्या शासकीय मैदानावर प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवक, युवती मैदानी शारीरिक चाचणीचा सराव अनेक वर्षांपासून करीत आहेत. याचा फायदा अनेकांना संरक्षण क्षेत्रात नोकरी प्राप्त करण्यासाठी झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात १३ युवकांची आर्मीत निवड झाली. विशेष म्हणजे यापैकी आठ युवक लोकमान्य टिळक महाविद्यालयातील एन.सी.सी.चे छात्र आहेत.

आता हे सर्व युवक वेगवेगळ्या ट्रेनिंग सेंटरवर प्रशिक्षणासाठी रवाना होत आहेत. यात वणी तालुक्यातील गणेश किनाके (वणी), पीयूष मोरे (चिखलगाव), भास्कर ठाकरे (वडजापूर), वैभव गौरकार (महाकालपूर), अजय शेंडे (बोरगाव-मे.), अजय विरुटकर (राजूर), पंकज राजूरकर (पुरड-ने.), राम बोदाडकार (मुर्धोनी), आकाश काकडे (मुर्धोनी),

हसमुख दुधकोहळे (सोनेगाव) तर मारेगाव तालुक्यातील सौरभ चौधरी (वरुड), कैलास गोवारकर (पिसगाव) तर केळापूर तालुक्यातील हिम्मत घोडाम (पात्री) यांचा समावेश आहे. तर मोहूर्लीचा राहूल वरारकर पीएसआय झाला आहे. यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले. मात्र एकाच वेळेस बहुसंख्येने आर्मीत यश संपादन करण्याची ही पहिलीच वेळ असावी.

निवड झालेल्या युवकांपैकी अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वणीच्या शासकीय मैदानावर सराव करणाऱ्यांपैकी अनेकांच जीवन घडलं. यात प्रा. दिलीप मालेकर यांचे मोलाचे योगदान आहे. नवीन मुलामुलींना सरावास प्रोत्साहन देण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गजानन स्पोर्ट्सच्या वतीने स्पोर्टस किट भेट देण्यात येते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.