कंत्राटदारांनी घरीच तयार केल्या बँकेच्या 18 लाखांच्या मुदत ठेव पावत्या !
आमदारांचा खळबळजनक आरोप, जिल्हा मध्यवर्ती बँकचे संचालक असलेल्या ठेकेदाराविरुद्ध प्रधान सचिवाकडे तक्रार... कंत्राटदार, बँक अधिकारी व जि. प. बांधकाम विभागाचे साटेलोटे?
जितेंद्र कोठारी, वणी: राजकीय नेता तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक असलेल्या एका कंत्राटदाराने चक्क बनावट FDR (मुदत ठेव पावती) तयार करून कंत्राट मिळविण्याचा प्रकार केल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाटण शाखेच्या तब्बल 18 लाख रुपयांच्या संकल्प मुदत ठेव योजनेचे बनावट बॉण्ड तयार करून जि.प. बांधकाम विभागाकडे सादर करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी आमदार यांनी केली आहे. रविवार 6 मार्च रोजी वणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बोदकुरवार यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
जिल्हा परिषद बांधकाम विभाग यवतमाळतर्फे जिल्ह्यात विविध भागात रस्ते बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. ऑनलाईन निविदा प्रक्रियेमध्ये पाटण येथील शासकीय कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांनी झरी तालुक्यातील 7 आणि केळापूर तालुक्यातील 2 रस्त्यांचे बांधकाम 15.1 टक्के कमी दराची निविदा भरून हे काम आपल्या पदरी पाडले. निविदेतील अटी व शर्तीनुसार न्यूनतम देकार असणाऱ्या निविदाकाराला निविदा उघडण्याच्या 8 दिवसांच्या आत अतिरिक्त सुरक्षा रक्कम बँक हमीपत्र, बँक ड्रॅफ्ट किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपात संबंधित विभागाकडे जमा करावी लागते.
कंत्राटदार आर.एम. येल्टीवार यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाटण शाखेत कार्यकारी अभियंता, जि.प. बांधकाम विभाग क्र.-1 च्या नावाने काढलेल्या 18 लाख 10 हजार रुपयांच्या 17 मुदत ठेव पावत्या (FDR) 21 फेब्रुवारी रोजी विभागाकडे सादर केल्या. मात्र 1 FDR वगळता इतर 16 FDR संगणकीय नसून हस्तलिखित असल्यामुळे FDR खोटे असल्याचा संशय निर्माण झाला. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सखोल माहिती काढली.
त्यानुसार दि. 16 फेब्रुवारी रोजी बँकेच्या पाटण शाखेत फक्त 10 हजार रुपयांची मुदत ठेव प्राप्त झाल्याची माहिती बँकेच्या मुख्य कार्यालयातून देण्यात आली. त्यामुळे बँक संचालक व कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार, रा. पाटण ता. झरीजामणी यांनी पाटण येथील शाखा प्रबंधक सोबत संगनमत करून 18 लाख रुपयांची बनावट मुदत ठेव पावत्या (FDR) तयार करून बांधकाम विभागाकडे जमा केल्याचे उघडकीस आले, असा आरोप आमदारांनी केला आहे.
बनावट FDR घोटाळ्याचे मूख्य सूत्रधार य.जि.म.स. बँकेचे संचालक व कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांनी बँकेचे पाटण शाखा व्यवस्थापक सोबत संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करत आ. बोदकुरवार यांनी सहकार आयुक्त, पुणे व प्रधान सचिव, सहकार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. राजीव येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करून त्यांच्या कंत्राटदार फर्मला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही आमदार बोदकुरवार यांनी केली आहे.
संचालक मंडळाची चुप्पी !
झालेला प्रकार हा धक्कादायक आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र बँकेच्या बनावट मुदत ठेव पावत्या(FDR) तयार करणाऱ्या खुद्द बँक संचालक व या गैरकृत्याला मदत करणाऱ्या शाखा व्यवस्थापक विरुद्ध कलम 420 अंतर्गत कारवाई करण्याऐवजी बँकेचे अधिकारी व इतर संचालक मंडळ मूग गिळून गप्प बसून आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.