विवेक तोटेवार, वणी: दररोज करोना संसर्गाचा वाढत अससेला प्रादुर्भाव बघता राज्यभरात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांसह बँकिंग सेवाही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, बँकेत होणारी गर्दी लक्षात घेता बँकांमधील कामकाजांवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्याच्या व भरण्याच्या आणि काही इतर सेवा वगळता इतर सर्व सेवा कमी करण्यात आल्या आहे.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवहार आता 10 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. वेगवेगळ्या बँकेने त्यांच्या वेळेनुसार शाखेचा वेळ ठरवला आहे. यात काही बँक 10 वाजता, काही 10.30 वाजता तर काही 11 तर वाजता सुरू होणार आहे. तर वणीतील जिल्हा मध्यवर्ती (शहर शाखा) ही सकाळी व संध्याकाळी सुरू असणारी बँक आता फक्त सकाळी 8.30 ते 11 पर्यंत सुरू राहणार आहे.
बँकेत अनेक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. तर अत्यावश्यक सेवा सुरू आहे. जसे कॅश जमा करणे आणि काढणे, चेक क्लिअरिंग, गव्हरमेंट ट्रॅन्झऍक्शन सुरू आहे. तर पासबुक प्रिंट आऊट सेवा, लोन सेवा बंद यासह काही अनावश्यक (कमी गरजेच्या) सेवा सुरू ठेवणे अथवा बंद करणे याचा निर्णय बँकेला स्थानिक पातळीवर करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
नेट बँकिंग आणि ऍपचा वापर करा
अत्यावश्यक काम असेल तरच बँकांमध्ये ग्राहकांनी यावे, अशा सूचनाही देण्यात येत आहेत. बँकेत येण्यापेक्षा ग्राहकांनी ऑनलाइन बँकिंग सेवांचा घरबसल्या उपयोग करावा, बँकेत होणारी गर्दी टाळावी, अशा सूचना देण्यात येत आहे.
बँकेत एका वेळी फक्त पाच लोकांना सोडण्यात येणार आहे. काही बँकेमध्ये बँकेत प्रवेश करण्याआधी प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी हात धुण्यासाठी सॅनेटाईजरची व्यवस्था केली आहे. तसेच ज्या व्यक्तीचे काम आहे त्याच व्यक्तींना आत सोडण्यात येणार आहे. तसेच बँकेमध्ये ग्राहकांमध्ये अंतर ठेवण्यासाठीही व्यवस्था केली आहे.