घोन्सा येथे कोरोनाचा शिरकाव, मयतीत गेलेली महिला पॉजिटिव्ह

हलगर्जीपणा भोवला, चिखलगाव येथील मयतीने वाढवली साखळी

0

जब्बार चीनी, वणी: प्रशासन वारंवार दिलेले नियम पाळण्याचे आवाहन करीत आहे. मात्र बेजबाबदारी व त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाचा थेट घोन्सा येथे शिरकाव झाला आहे. तेली फैलातील एक महिला चिखलगाव येथे मयतीत गेली होती. ती पॉजिटिव्ह आली होती. तेलीफैल येथील पॉजिटिव्ह महिलेच्या संपर्कात मयतीच्या निमित्ताने घोन्सा येथील महिला आली होती. तिला कॉरन्टाईन करण्यात आले होते. आज त्या महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. नवीन रुग्ण आढळताच तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 39 झाली आहे.

सध्या तेली फैल कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित जाहीर करून या परिसराच्या बाहेर येण्यास मज्जाव केला आहे. मात्र प्रशासनाच्या सूचना धाब्यावर बसवून तेली फैलातील एक होम कॉरन्टाईन महिला 22 जुलैला प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर येत चिखलगाव येथे एका नातेवाईकाच्या मयतीत गेली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेचा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यानुसार त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्यास प्रशासनाने सुरूवात केली.

चार दिवसांनी त्या महिलनेने प्रशासनास चिखलगाव येथे एका मयतीत गेल्याचे सांगितले. हे कळताच प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रशासनाने वेळ न दवडता चिखलगाव येथे अंत्यसंस्कारास गेलेल्या व्यक्तींची माहिती काढून 64 व्यक्तींना कॉरन्टाईन केले. या 64 व्यक्तींचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज ते सर्व रिपोर्ट आलेत. त्यातील 63 रिपोर्ट निगेटिव्ह तर घोन्सा येथील एक महिला पॉजिटिव्ह आली आहे.

घोन्सा येथे एकच खळबळ
घोन्सा येथे कोरोनाचा रुग्ण मिळाल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी व टीम दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घोन्सा येथे पोहोचली. त्यांनी तातडीने स्थानिक लोकप्रतिनिंशी गावातील शासकीय रुग्णालयात बैठक आयोजित केली. दुसरीकडे रुग्ण मिळाल्याची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. दुकान पटापट बंद करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने महिला राहत असलेला परिसर सिल करण्यास सुरूवात केली. पॉजिटिव्ह महिला शेतामध्ये मजुरीचे काम करीत असल्याने तिच्या संपर्कात शेतात काम करणा-या इतर महिला मजूर होत्या. सुमारे पॉजिटिव्ह महिलेल्या संपर्कात आलेल्या सुमारे 25 महिलांना ट्रेस करण्यात आले असून त्यांना कॉरन्टाईन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

पेट्रोल पम्प साखळी आता ग्रामीण भागात
वणीत कोरोनाच्या वरोरा रोड, पेट्रोल पम्प, साई नगरी, राजूर व चिखलगाव अशा पाच साखळी तयार झाल्या आहेत. यातील पहिली (वरोरा रोड) व तिसरी (साई नगरी) ही साखळी खंडीत झाली आहे. तर चिखलगाव येथील साखळीचे संपूर्ण रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाही. चौथी (राजूर) येथील साखळीमुळे कुंभा येथील एक पुरुष व राजूर येथील एक महिला पॉजिटिव्ह आली आहे. तर दुसरी साखळी (पेट्रोल पम्प) ही सध्या तेली फैलात चांगलाच हौदोस घालीत आहे. एकीकडे तेली फैलातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असताना आता ही साखळी तेली फैलातून घोन्सा येथे पोहोचली आहे.

आता पर्यंत मोठ्या शहरातून गावात येणा-या व्यक्तींना 14 दिवस शाळेत कॉरन्टाईन करून ग्रामीण भागातील व्यक्तींनी कोरोनाचा आपल्या गावात शिरकाव होऊ दिला नव्हता. मात्र आता गावातीलच लोक वणीसारख्या कोरोनाबाधित शहरात जाऊन कोरोना गावात घेऊन येताना दिसत आहे. राजूर, कुंभा, मुकुटबन नंतर आता घोन्सा येथे रुग्ण आढळल्याने ग्रामीण भागात राहणा-यांची चिंता वाढली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.