अखेर ‘त्या’ संशयीत रुग्णाचा रिपोर्ट आला….

वणीत विदेशातून आलेले प्रवासी स्थानबद्ध

0

सुनील पाटील, वणी: शहरातील नांदेपेरा मार्गावर वास्तव्यास असलेल्या वेकोलित कार्यरत कर्मचा-याला कोरोनाची लागण झाल्याची अफवा काही दिवसापुर्वी पसरविण्यात आली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याला वेकोलि प्रशासनाने तात्काळ नागपुर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णांलयात चाचणी करीता पाठवले होते. विस्तृत चाचणीअंती त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे त्या रुग्णाने सुटकेचा नि:श्वास घेतला. तसेच यामुळे परिसरात चाललेल्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला.

नांदेपेरा रोड परिसरात वास्तव्यास असलेला एक व्यक्ती वेकोलीतील माजरी कार्यालयात कर्तव्यावर होती. त्यांना दोन दिवसापूर्वी ताप आला होता. यामुळे ते वणीत उपचार घेत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची अफवा माजरी कार्यालयात पसरविण्यात आली. यामुळे तेथील कर्मचारी सैरभैर झाले तर भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

कालांतराने ती व्यक्ती कर्तव्यावर रुजु झाली असता वेकोली प्रशासनाने त्यांना तातडीने वैदयकीय अधिका-यांच्या मदतीने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णांलयात रुग्णवाहीकेच्या साहयाने पाठवले होते. तेथे त्यांचेवर कोरोनाबाबतच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्या. त्यामुळे त्यांच्या परिवारांसह वणीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे परंतु नाहक अफवा पसरविल्यामुळे काही दिवस त्यांचेसह परिवाराला मानसिक त्रास सहन करावा लागला होता हे विशेष.

वणीत विदेशातून आलेले प्रवासी स्थानबद्ध
वणीमध्ये विदेशातून प्रवास करून आलेले 12 व्यक्ती व देशांतर्गत प्रवास करून आलेल्या 49 व्यक्तींना होम कॉर्नटाइन करून ठेवण्यात आले आहे. या व्यक्तींची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरीच पुढील 14 दिवसापर्यंत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विदेशातून आलेल्या 12 व्यक्तीच्या डाव्या हातावर आरोग्य विभागातर्फे शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे या व्यक्ती बाहेर पडल्यास यांना ओळखणे सोपे जाणार आहे.

वणीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही
विदेशातून प्रवास करून आलेल्यांची व देशांतर्गत विविध भागातून प्रवास करून आलेल्या व्यक्तींची पूर्ण तपासणी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात येत आहे. या विषाणू विषयी जागरूकता निर्माण झाल्यामुळे बाहेरून प्रवास करून येणारे प्रवासी स्वतः रुग्णालयात येऊन तपासणी करून घेत आहेत. तसेच वणीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.