धक्कादायक… पुण्याहून वणीत आलेल्या अनेकांनी टाळली तपासणी !
वणीकरांचा जीव टांगणीला, प्रशासनाचेही दुर्लक्ष
जब्बार चीनी, वणी: सध्या संपूर्ण राज्य कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून बाहेरगावाहून येणा-या लोकांनी सर्वात आधी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून पुण्याहून व दिल्लीहून परत आलेल्या काही महाभागांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता थेट घरी प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वणीकरांचा जीव टांगणीला लागला आहे.
वणीत परराज्यातून, परदेशातून तसेच परजिल्ह्यातून अनेक लोक आलेत. यात अनेकांनी स्वतःहून जाऊन वैद्यकीय तपासणी केली आहे. त्यातील 410 लोकांना मंगळवार पर्यंत होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 15 लोकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. या सर्वांना निगराणीत ठेवण्यात आले आहे. यातील एक शिक्का असलेली व्यक्ती घराबाहेर निघाला असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखलही करण्यात आला आहे. गेल्या 3-4 दिवसात अनेक लोक बाहेरगावाहून वणीत परत आले. त्यातील अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तापसणी केली.
मात्र यातील 7 व्यक्तींनी पुणे, दिल्लीहून परत येऊन कोणतीही वैद्यकीय तपासणी न करताच घरी प्रवेश केला असल्याची माहिती आहे. यातील 2 लोक साईनगरीतील, 3 लोक लक्ष्मीनगरचे तर 2 लोक सर्वोदय चौकातील आहे. यातील साईनगरीचे लोक खासगी टॅक्सीने तर सर्वोदय चौकातील 2 व्यक्ती मोटारसायकलने पुण्याहून वणीला आले. मात्र गरजेचे असतानाही यांनी वैद्यकीय तपासणीकडे दुर्लक्ष करून यापासून पळ काढला आहे. यासोबतच आम्हाला काहीही झालेलं नाही या अविर्भावात अनेकांनी मोठ्या शहरातून वणीत येऊन सुद्धा तपासणी केलेली नाही.
प्रशासनाला याची माहिती
या संदर्भात ‘वणी बहुगुणी’ने महसूल प्रशासन व आयोग्य प्रशासनाला कल्पना दिली. मात्र या दोन्ही विभागने याकडे दुर्लक्ष केले. आरोग्य प्रशासनाकडून बाहेर गावाहून येणा-यांनी स्वतःहून येऊन भेट द्यायला हवी असे निष्काळजीपणा दाखवणारं उत्तर दिलं. सध्या कामाच्या व्यापामुळे आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण आलेला आहे. त्यात नागरिकांनी स्वतः जागरूक राहणे गरजेचे असताना ते स्वतःच दुर्लक्ष करीत असेल तरी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे व कार्यवाही करणे गरजेचे आहे.
लोका सांगे ब्रह्मज्ञान
पुण्याहून परत आलेल्या या 7 जणांमधील एका व्यक्तीचे वडील हे सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत आहे. एकीकडे आपत्ती व्यवस्थापन सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन आणि जनजागृतीचे कार्य करीत आहेत. तर दुसरीकडे त्याचाच एक भाग असलेले एक कर्मचारी स्वतःचा मुलगा बाहेरगावाहून आल्यावरही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. महत्त्वाचं म्हणजे याची कल्पना आपत्ती व्यवस्थापनात काम करणा-या इतर कर्मचा-यांनाही आहे. मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे.
सध्या प्रशासनाने हे प्रकरण अतिशय हलक्यात घेतले आहे. मात्र यातील एकही व्यक्ती जर पॉजिटिव्ह निघाला तर संपूर्ण वणी व परिसराचा जीव टांगणीला लागू शकतो. कारण हे लोक गेल्या चार दिवसांपासून अनेकांच्या संपर्कात आले आहे. बाहेगावाहून आलेल्यानी तपासणी करणे गरजेचे आहे. काहींनी या तपासणीपासून पळ काढला आहे. याची कल्पना देऊनही प्रशासन याकडे डोळेझाक का करीत आहे हे कळायला मार्ग नाही.