डॉक्टर्स, नर्स, पोलीस, वकील नंतर आता पत्रकाराला कोरोना

◆ बेड उपलब्ध न झाल्याने परराज्यात उपचार सुरू

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. सर्वसाधारण नागरिकांसह डॉक्टर्स, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, महसूल अधिकारी, वकील यांच्यानंतर आता शहरातील एका पत्रकारालासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र तिथे बेड न मिळाल्याने त्यांच्यावर तेलंगाणा येथील अदिलाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या पत्रकारासह वणीतील आणखी 5 जणांवर अदिलाबाद येथे उपचार सुरू आहे. प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कोरोनाच्या संबंधित वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे इतर पत्रकारांमध्ये दहशत पसरली आहे.

एका वृत्तपत्राचे वणीचे तालुका प्रतिनिधी असलेल्या एका पत्रकाराला काही दिवसांआधी अत्यवस्थ वाटले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी डेंगू, मलेरिया, टायफॉयडची टेस्ट केली. त्यासह खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची रॅपिड अँटीजन टेस्टही केली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र तरीही शरीरात थकवा व कमजोरी जाणवत होते. त्यामुळे त्यांनी नागपूर येथे धाव घेतली. नागपूर येथील खासगी लॅबमध्ये त्यांनी कोरोनाची आरटी-पीसीआर स्वॅब टेस्ट केली. त्यात ते पॉजिटिव्ह आले.

पुढील उपचारासाठी त्यांनी नागपूर येथील अनेक खासगी दवाखान्यात विचारणा केली. परंतु एकाही हॉस्पिटलमध्ये बेड खाली नसल्याचे सांगण्यात आले. अखेर वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मदतीने त्यांना आदिलाबाद येथील एका खासगी दवाखान्यात बेड उपलब्ध करून देण्यात आला. आदिलाबाद येथील रुग्णालयात सदर पत्रकारासह वणी शहरातील 5 रुग्ण उपचार घेत आहे. त्यापैकी 2 रुग्ण आयसीयूमध्ये तर 3 रुग्ण कोविड वार्ड मध्ये दाखल आहे.

सावधान वणीकरांनो, बेड उपलब्ध नाही…
केवळ आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण राज्यभरात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालये तर हाउसफुल्ल झाली आहेत शिवाय आता खासगी रुग्णालयातही बेड उपलब्ध नाहीत. वणीतून नागपूर येथे गेलेल्या अनेक रुग्णांना या समस्येला तोंड द्यावे लागले आहे.पुढील काळात परिस्थिती अजून बिकट होईल. उपचारासाठी मुबलक पैसे, ओळख आणि शिफारशी असतानाही रुग्णांना खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध होत नाहीये, शिवाय शासकीय रुग्णालयातही बेड मिळणे अवघड झाले आहे.

त्यामुळे वणीकरांनी आता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. योग्य आणि स्वच्छ मास्क वापरावा. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक वस्तूला स्पर्श करू नये. हॅन्डवॉश किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. ताप, खोकला, थकवा जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा व कोविडची लक्षणं असल्यास टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.