जब्बारी चीनी, वणी: आज रजा नगर येथील 1 शास्त्री नगर येथे 2 तर शिंदोला येथील 1 व्यक्ती तर ट्रॅफिक विभागातील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉजटिव्ह आढळून आली आहे. तालुक्यातील कोरोनाची जवळपास सर्व साखळी खंडीत होत असतानाच नवीन रुग्ण आढळून साखळी वाढत असल्याने परिसरात चिंता वाढली आहे. आज 5 रुग्ण आढळल्यामुळे वणी तालु्क्यात कोरोना रुग्णांची संख्या 72 झाली आहे.
दोन दिवसांआधी सोमवारी वणीतील पोलीस विभागातील एका कर्मचा-याला कोरोनाची लागण झाली होती. सध्या त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोनाची टेस्ट घेणे सुरू आहे. काल मंगळवारी वणीत पोलीस विभागातील 1 तर गृहरक्षक दलातील 1 व्यक्ती पॉजिटिव्ह आढळून आली होती. पोलीस विभाग, गृहरक्षक दलानंतर आता कोरोनाने ट्रॅफिक विभागात आपली एन्ट्री केली आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ट्रॅफिक विभागातील 1 महिला. शास्त्रीनगर येथील 2 पुरूष, रजानगर मधील 1 पुरुष, शिंदोला येथील 1 पुरुष पॉजिटिव्ह निघाले आहे. शास्त्रीनगर येथील यवतमाळला गेलेल्या एका व्यक्तीपासून शास्त्रीनगरची साखळी वाढत आहे. चिंचोली येथील रुग्णांपासून साखळी वाढत ती आता शिंदोल्यापर्यंत पोहोचली आहे. तर बिहारवरून परत आलेल्या रजा नगर येथील व्यक्तीमुळे रजा नगर येथील साखळी वाढत आहे. एकीकडे हॉटस्पॉट ठरलेला तेली फैल लो रिस्कमध्ये आला आहे मात्र दुसरीकडे नवीन रुग्णांमुळे साखळी वाढत असल्याने प्रशासनासह तालुक्यातील रहिवाश्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
आज यवतमाळ येथे पाठविण्यात आलेले 39 रिपोर्ट प्राप्त झाले असून यात 2 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 112 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली यातील 3 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या वणीत कोरोनाचे 72 रुग्ण झाले असून यातील 50 व्यक्ती कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. 2 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 20 व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. आज यवतमाळ येथे 29 स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहेत. यवतमाळ येथून अद्याप 54 रिपोर्ट येणे बाकी आहे.