कोरोनाच्या रुग्णाचा कोविड सेंटरमध्ये जाण्यास नकार…

पिसगाव येथे रंगले नाट्य, प्रशासनाची उडाली भांबेरी

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यताील पिसगाव येथे कोरोना रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यावरून  चांगलेच नाट्य रंगले. रुग्णांने चक्क कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिल्याने प्रशासनाची चांगलीच भांबेरी उडाली. रुग्णाला उपचारासाठी नेण्यावरून प्रशासन व गावकरी आमनेसामने आले. यावरून पिसगावमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवस हा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. अखेर प्रशासन आणि गावक-यांनी यावर मध्यममार्ग काढल्याने या नाट्यावर आज पडदा पडला.

सोमवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी पिसगाव येथील दोन व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या होत्या. त्यामुळे त्यांना उपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रशासनाने ऍम्बुलन्स पाठवली. गावात ऍम्बुलंस पोहोचली. मात्र त्यावेळी तिथे शेकडो गावकरी गोळा झाले. त्यांनी रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये घेऊन जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावरून तिथे चांगलेच नाट्य रंगले. या प्रश्नावर गावक-यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक हे आल्या पावली परत गेले.

तिथे गेलेल्या कर्मचा-यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. आज 22 सप्टेंबर मंगळवारी रोजी महसूल, आरोग्य विभागाची टीम सोबत पोलीस विभागाचे कर्मचारी घेऊन पिसगावात पोहोचली. रुग्णाला घेऊन जाण्यास प्रशासनाची टीम आल्याने गावकरी पुन्हा गोळा झाले. त्यांनी आजही आधीचीच भूमिका कायम ठेवत रुग्णांस घेऊन जाण्यास नकार दिला.

असा निघाला मार्ग….
प्रशासनाच्या टीमने गावक-यांसोबत चर्चा केली. त्यांनी रुग्णाला गावात ठेवणे धोक्याचे असल्याचे सांगितले पण गावकरी मानण्यास तयार नव्हेत. अखेर घनघोर चर्चेनंतर प्रशासनाने नमते घेत एक पाऊल मागे आले. त्यांनी दोन्ही रुग्णास होम आयसोलेशन राहण्याचा पर्याय दिला. गावक-यांनी तो पर्याय मान्य केल्यानंतर अखेर या नाट्यावर पडदा पडला.

गावकरी अफवा आणि गैरसमजाचा बळी ?
13 सप्टेंबर रोजी पिसगाव येथील एक रुग्ण कोविड पॉजिटिव्ह आला होता. त्याला मारेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र केवळ दोन दिवसात या रुग्णाला सुटी देण्यात आल्याचा दावा गावक-यांनी केला आहे.  त्यामुळे गावक-यांमध्ये विविध अफवा व गैरसमजाला ऊत आला आहे. कोरोना वगैरे काहीही नाही. कोविड सेंटरमध्ये गैससोय आहे. तिथे रुग्णांवर कोणताही उपचार होत नाही. तिथे नेऊन चार दिवस ठेवतात व परत घरी सोडतात. असे अनेक समज गैरसमज गांवक-यांमध्ये आहे. यातून हे नाट्य घडल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनाने रुग्णाला दोन दिवसातच गावात का सोडले? हा देखील प्रश्न या निमित्ताने गावकरी उपस्थित करीत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.