शिंदोला परिसरातील कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव
सोयाबीनवर अळ्याचे आक्रमण, उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यावर भरोसा ठेवत बहुतांश शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात खरीप पिकांची लागवड केली. अवकाळी पावसामुळे 12 जून पर्यंतच्या पेरण्याही साधल्या. मात्र ऐन पिके वाढीच्या काळात पावसाने दडी मारली. पिकांची वाढ खुंटली. तालुक्यात अधूनमधून तुरळक पाऊस पडत होता. परंतु दमदार पाऊस झाला नाही.
जलसिंचनाची सोय असलेल्या 15 ते 20 टक्के शेतकऱ्यांनी वीज भार नियमनाचा सामना करत रात्र काळात जीव धोक्यात घालून पिकांना जगविले. पोळ्याच्या पर्वावर समाधानकारक पाऊस पडला. परंतु ढगाळ व दमट वातावरण, अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे कपाशी, सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. कपाशीवर रसशोषक किडी, मिलिबग, दह्या,मर रोग तर सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला.
वणी तालुक्यात 25 ते 30 टक्के क्षेत्रातील कपाशीच्या पिकाने रोगामुळे आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे. शिंदोला परिसरात कपाशीवरील रोगामुळे 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले आहे. सावंगी येथील शेतकरी नारायण ढवस, संदीप ढाक, माधव ढवस, धिरज पिदूरकर, येनक येथील बाळा घोरपडे, विलास ढवळे, विकास खामनकर, सुरेंद्र पंडिले, पंकज ढवळे, दत्ता खामनकर, अनिल गारघाटे, चिखली येथील प्रभाकर चटप, किशोर पारखी, मुंगोली येथील भाऊराव ताजने आदी शेतकऱ्यांची कपाशीचे पीक सुकत आहे.
सध्या कपाशीला 20 ते 30 परिपक्व बोंडे झाली आहे.मात्र मर रोगांनी झाडे सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आनंद चिंतेत बदलला.शेतकरी हातातोंडाशी आलेले पीक वाचविण्यासाठी उसनवारी करून कीटकनाशके फवारीत आहे.शेतकऱ्यांना पिकांवरील कीड, रोग, उपाय आदीबद्दल परिपुर्ण माहिती नसल्याने कृषी केंद्र संचालक नको ती कीटकनाशके माथी मारत आहे.
गावात, शिवारात कपशिवरील रोगाबद्दल चर्चा रंगताना दिसून येत आहे. कृषी विद्यापीठातील पीक संरक्षण विभागातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.