बोंडअळीला वैतागून शेतक-यांनी उपटली कापसाची झाडे
सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यात सध्या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पाटण, मुकुटबन, पिंपरड, येडशी, अडेगाव, खातेरा, बहिलमपुर, मांगली , राजूर, हिरापूर, भेंडाळा, शिबला, माथार्जुन व इतरत्र सर्वच गावात ही समस्या दिसून येत आहे. परिसरातील शेतीत असणारे कापसाचे बोंड बाहेरून छान हिरवेगार दिसत आहे. पण त्या बोंडाना फोडून पाहिले असता त्यात बोंडअळ्या आढळून येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून अखेर नैराश्यात शेतकरी कापसाच्या झाडांना चिमट्याने किवा ट्रॅक्टरने उपडुन फेकत आहे .
कापसाच्या एक किंवा दोन वेचणी नंतर कापसांच्या बोंडामधे गुलाबी बोंडअळी आढळुन येत आहे. त्यामुळे बोंडांची वाढ खुंटली आहे. इतर पिकांवर सुध्दा रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. याबाबत काही गावातील शेतक-यांनी कृषी अधिका-यांकडे आणि तहसीलदाराकडे धाव घेतली, तर मुकुटबन येथील शेतक-यांनी सरपंच शंकर लाकडे यांच्याकडे धाव घेतली.
शंकर लाकडे यांनी कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी शेतातील पिकांची पाहणी केली.व इतर गावात सुद्धा पिक पाहणी केली पण शासनाद्वारे सुध्दा किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात येत नाही त्यामुळे शेतकरी हवालदील त्रस्त झाला आहे आणि कापसाचे झाड उपडुन त्या ठिकाणी चना हरबऱा पेरन्याची तयारी करीत आहे.
जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २३ शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले. कार्यवाहीच्या धास्तीने कृषीकेंद्र संचालकानी कीटकनाशके विकणे बंद केले. त्यामुळे शेतक-यांना फवारणीसाठी औषधी मिळणे कठीण झाले आहे. परिणामी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे कापसाला सात हजार रुपये प्रत्ती क्विंटल व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रत्ति क्विंटल भाव देण्यात यावा.
तहसीलदार झरी, गट विकास अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी यांना पाटण येथील विठ्ठल मुत्यालवार महाराज, अमजद शेख, शेखर बोनगिरवार, विठ्ठल गिज्जेवार, राहुल अनमूलवार, प्रमोद कामनवार, संकेश कत्तुरवार यांनी निवेदन दिले व शेतकर्यांना शासनातर्फे कीटकनाशकांची उपलब्धता करून द्यावी व पिकांचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत व शेतमालाला भाव देण्यात यावी अशी मागणी केली.