मुकूटबनमध्ये 4 हजार 350 रुपये भावात कापसाची खरेदी सुरू
केवळ एकच व्यापारी कापूस खरेदीसाठी हजर
रफीक कनोजे, झरी: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस खरेदी केन्द्राचा बुधवारी मुहुर्त झाला. बालाजी जिनिंगचे संचालक मालपाणी यांच्या मार्फत हा मुहुर्त करण्यात आला. यात कापसाला 4 हजार 350 रुपये प्रति क्विंटल भाव निघाला. मुकुटबन येथील शेतकरी सोमन्ना तिपर्तिवार यांना संदीप बुर्रेवार (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, झरी) यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांच्या बैलगाडीचा काटा करुन त्यांना 4 हजार 350 रुपये भाव देण्यात आला. कापसाला 10 टक्के (ओलावा) माईश्चर सुट देण्यात येणार आहे. दिवसाखेर कोणत्याही गाडीला 4 हजारापेक्षा कमी भाव दिला गेला नाही.
शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट उमटत होती. कापसात ओलावा असल्याचं कारण समोर करीत कापूस खरेदी केन्द्रे दिवाळीच्या 8 दिवसानंतर सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्याची दिवाळी अंधारात गेली. अनेक व्यापाऱ्यांनी खेड़ा खरेदी सुरु करुन गरीब शेतकऱ्यांचे पांढरे सोने कवडी मोल भावाने खरेदी केले.
फक्त एकच व्यापारी खरेदीसाठी तयार
परतीच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे पीक खराब झाले. काही प्रमाणात कापूस ओला झाला त्यामुळे मुकूटबन येथील सहा व्यापाऱ्यांपैकी फक्त एकच व्यापारी कापुस खरेदी करण्यास तयार झाला. पाच व्यापारी आले नाही. त्यामुळे पाच व्यापाऱ्यांना शोकाज नोटीस पाठविण्यात याव्या असा तोंडी आदेश संचालक मंडळानी सचिव रमेश येल्टीवार यांना दिला.
कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गुरूवारपासून सकाळी ६ ते १० वाजेपर्यत येणाऱ्या शेतकऱ्यांना व गाडी चालकाला नास्ता देण्यात येइल. तसंस वणी येथे जो भाव निघेल तोच भाव कापुस व सोयाबिन ला देण्यात येणार आहे. यावेळी सचिव रमेश येल्टीवार, सभापती संदिप बुर्रेवार, उपसभापती संदीप विंचू, संचालक बापूराव जिन्नावार, गजानन मांडवकर, मनोहर बघेले, विमल जैन, विजय कोठारी, बोल्लेनवार, सुनिल ढाले, संजय भोयर व इतर संचालक हजर होते.