बहुगुणीकट्टा: जितेंद्र बोदकुरवार यांचा लेख “एक व्यथा अशीही”

शेतमजुरांची कमतरता आणि शेतकऱ्यांची परिस्थिती यावर धगधगतं वास्तव

0

आज शेतकरी राजानं मोठ्या काबाडकष्टाने पिकवलेले पांढरे सोन काळ्या मातीत डोलायला लागलं. थोडे का होईना सुख डोळ्यात फुलू लागले. मात्र हे सोनं घरी आणण्याकरीता किती भयानक परिस्थिती आज शेतकऱ्यावर आली. त्याच वास्तव मी आज प्रत्यक्ष अनुभवले.

सकाळचे 10 वाजले होते. आदिलाबाद रेल्वे स्टेशनवर मजूर वर्गाची वाट मी पण बघत होतो. जणू एखादा चातक पक्षी पावसाची पहिल्या सरीसाठी आतुर असतो, अगदी त्याचप्रमाणे. फलाटावरच्या तूफान गर्दीत शेतकऱ्याचीच संख्या जास्त. प्रवासी म्हणुन नाही तर मजुराच्या शोधात. कारण विदर्भ, तेलंगाना व आंध्रप्रदेश, सीमालगत भागात कापूस हे मुख्य पीक आहे. या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे वेचनिला आलेला कापूस मजुराची कमतरता असल्याने घरी कसा आणावा यासाठी सर्वांचा जिवाचा आटापीटा सुरू होता. फलाटावर मजूर वर्गापेक्षा शेतकऱ्याचीच संख्या जास्त प्रमाणात होती. मजुरांचा एखादा समूह रेल्वेतून उतरला की जणु एक होडच लागत असे. आपल्याकडे मजुरानी यावं या करीता.

अन्न, धान्य, राहण्याची सोय अश्या विविध प्रलोभन देत मजुरांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना शेतकरी दिसत होते. मजुरही संडास-बाथरूमची मागणी करत जणू त्याच्या सहनशक्तीच्या तारा छेडत असे. खरी शोकांतिका तर ती होती. जेव्हा एक शेतकरी मजूराचे सामान डोक्यावर घेऊन गावाकडे चालण्यास विनवण्या करत होता. मात्र मजूर जास्त भावाच्या हट्टाहासाने आपल्या मतावर ठाम होता.

किती विचारांचे काहूर त्या शेतकऱ्याच्या डोक्यात असेल, त्याचा हरवलेला स्वाभिमान, त्याची हतबलता. आजच्या विज्ञानवादी युगातील ही किती मोठी शोकांतिका. या whatsaap , facebook च्या युगात वैतागलेला, त्रासलेला, थकलेला शेतकरी वाचलाय. पण काळजाचे पाणी करणारे क्षण मी आज स्वत: अनुभवला. कारण मजुर न मिळाल्याने शेतकऱ्याच्या यादीतील मीही एक हतबल झालेला निसाहाय्य शेतकरीच ना….

✍ जितेन्द्र बोदकुरवार मु. लिंगटी, ता. झरी
मो. 9420043544

+++++++++

वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलसाठी आर्टिकल, कविता पाठवण्यासाठी, तसंच तुमच्यात असणा-या कलागुणांविषयी माहिती देण्यासाठी

संपर्क : निकेश: 9096133400

Email id: [email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.