चोपण शिवारातील बंड्यातून कापसाची चोरी

शेतक-याचे एक लाखांचे नुकसान, मारेगाव तालुक्यात कापूस चोरटे सक्रीय

भास्कर राऊत, मारेगाव: शेतातील बंड्यात ठेवलेला कापूस चोरी गेल्याची घटना तालुक्यातील चोपण येथे घडली. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या चोरीत चोरट्यांनी 12 क्विटल कापूस चोरला. सध्या कापसाला योग्य भाव नसल्याने शेतक-यांनी शेतात निघालेला कापूस बंड्यामध्ये ठेवलेला आहे. ही संधी साधूनच चोरटे आता बंड्यात जाऊन कापसाची चोरी करीत आहे. तालुक्यातील याआधीही कापूस चोरीची घटना उघडकीस आली आहे. 

चोपण येथील शेतकरी पांडुरंग सुधाकर तुरंगे यांची चोपण गावालगतच शेती आहे. त्या शेतात त्यांनी शेतमाल, अवजारे ठेवण्यासाठी बंडा बांधलेला आहे. सध्या या बंड्यात त्यांच्या शेतात निघालेला कापूस ठेवलेला होता. दि.13 जानेवारीच्या सकाळी शेजारीच्या शेतातील एक शेतकरी शेतातून जात असताना त्यांना बंड्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले.

त्यांनी लगेच पांडुरंग तुरंगे यांना कॉल करून याची माहिती दिली. पांडुरंग यांनी लगेच शेतात जाऊन बघितले असता अंदाजे लाखाच्यावर कापूस चोरी गेल्याचे निदर्शनास आले. लगेच त्यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला ही बातमी कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

सततच्या कापूस चोरीने शेतकऱ्यांमध्ये धास्ती
शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच बंड्यामध्ये ठेऊन असलेल्या कापसाची वारंवार चोरी होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे घर लहान असल्याने अनेक शेतकरी शेतातून काढलेला माल शेतामध्ये असलेल्या बंड्यात ठेवतात. परंतु आता चोरटे हे शेतातील बंडयामधूनच चोरी करायला लागल्याने शेतातील माल कोठे ठेवायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. अनेक शेतकरी शेताला तारेचे कुंपण असून सुद्धा रात्री जागलीसाठी जात असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

हे देखील वाचा: 

ब्रेकिंग न्यूज: शिवसेना (शिंदे) गटाला मोठा धक्का, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांचा राजीनामा ?

साउथचा सुपरस्टार थलपथी विजयचा वारीसू सिनेमा रिलीज….

बसमध्ये वाहकाला हृदयविकाराचा धक्का, कर्तव्यावर असलेल्या वाहकाचा मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.