कोविड हॉस्पिटल प्रकरणात युवासेनेची उडी
प्रशासन सुरक्षा देत नसेल तर युवासेना सुरक्षेसाठी पुढाकार घेणार
जब्बार चीनी, वणी: कोविड हॉस्पिटल प्रकरणात आता शिवसेना प्रणीत युवासेनेने उडी घेतली आहे. जर हॉस्पिटलला सुरक्षा देण्यास प्रशासन असमर्थ असेल तर युवासेना सुरक्षेसाठी पुढाकार घेणार अशी भूमिका युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी घेतली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत आहे. बेड उपलब्ध नसल्याने लोकांना उपचारासाठी परराज्यात जावे लागत आहे. अशावेळी तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू होणे गरज असताना भाजपचे नेते लोकांना भडकवून राजकारण करण्यात दंग आहे, असा आरोपही युवासेनेतर्फे करण्यात आला आहे.
सध्या कोविड हॉस्पिटलवरून परिसरात चांगलेच नाट्य रंगत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून लोढा हॉस्पिटल येथे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान दिनांक शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी भाजप नगर सेवक प्रशांत निमकर यांच्या नेतृत्वात शेकडो स्थानिक रहिवाशांनी हॉस्पिटलवर धावा बोलत तिथले काम थांबवले. त्यामुळे डॉ. महेंद्र लोढा यांनी जो सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नाही असे स्पष्ट केले.
डॉ. लोढा यांच्या समर्थनात आता युवासेना धावून आली आहे. कोरोनामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूसंख्याही वाढत आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू असताना परिसरात आणखी कोविड हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. मात्र असे असताना नगरसेवकांच्या साथीने व स्थानिकांना भडकावून राजकारण केले जात आहे. असा आरोप युवासेनातर्फे करण्यात आला आहे.
प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा दबाव: विक्रांत चचडा
कोविड रुग्णालय हे आपल्याच उपचारासाठी आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार तिथे उपचार सुरू होणार आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता आपल्या परिसरात एकच नाही तर आणखी कोविड हॉस्पिटल होणे गरजेचे आहे. नागपूर, पुणे सारख्या शहरात वस्तीमध्येच कोविड रुग्णालय आहे. तिथे बाजुला राहणा-या कोणत्याही लोकांना हॉस्पिटलमुळे कोरोना झालेला नाही. भाजप स्थानिकांची दिशाभूल करून केवळ राजकारणासाठी लोकहिताच्या कामात खोडा घालण्याचे काम करीत आहे. वणीत कोविड हॉस्पिटल झाले तर उद्या नागपूर साऱख्या शहरात किंवा परराज्यात उपचारासाठी जाण्याची रुग्णांना गरज भासणार नाही. हॉस्पिटल सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांचा आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देणे प्रशासनाचे काम आहे. मात्र काही लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने हॉस्पिटलला तात्काळ सुरक्षा पुरवावी. जर प्रशासन सुरक्षा पुरवण्यास असमर्थ असेल तर युवासेना संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेईल.
– विक्रांत चचडा, जिल्हा प्रमुख युवासेना
युवासेनेने या प्रकरणात उडी घेतल्याने आता सत्ताधारी विरुद्ध भाजप असे वळण मिळाले आहे. 25 सप्टेंबरच्या आधी कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी डेडलाईन मिळाली आहे. हॉस्पिटलला सुरक्षा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र प्रशासनाकडून अद्यापही हॉस्पिटलला सुरक्षा मिळालेली नाही. तर सुरक्षा मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही असे लोढा हॉस्पिटलतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासन लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली असल्याचाही आरोप होत आहे. आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.