विवेक तोटेवार, वणी: दुकानाची तोडफोड केल्याप्रकरणी माजी आमदार व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह सुमारे 15 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने आज मंगळवारी दिनांक 26 मे रोजी सकाळी शिवसैनिकांनी आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रतिष्ठाणावर हल्लाबोल केला होता.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये विश्वास नांदेकर, रवी बोढेकर, अजय नागपुरे, विक्रांत चचडा, बंटी येरणे यांच्यासह 8 ते 10 अनोळखी इसम यांच्यावर भादंवि कलम 147, 148, 149, 452, 427, 188, 269, 504, 506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याबाबत दोन्ही बाजूने चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी काल सोमवारी वणी पोलीस ठाण्यात वणीतील दोन व्यवसायिक सतिश पिंपरे व विवेक पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे हे प्रकरण मिटले असे वाटत असतानाच आज शिवसैनिकांनी आक्रमक प्रवित्रा घेतला.
विवेक पांडे यांचे जटाशंकर चौक इथे पांडे ऍन्ड सन्स नावाचे मोबाईल शॉपी आहे. तर सतिष पिंपरे यांची नांदेपेरा रोडवर रसवंती आहे. सकाळी सव्वा दहा ते साडेदहाच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात काही शिवसैनिकांचा जत्था यांनी नांदेपेरा रोडवर असलेल्या पिंपरे यांच्या रसवंतीजवळ पोहोचला. त्या दुकानावर हल्लाबोल करत शिवसैनिकांनी दुकानाचे काउंटर, फ्रिज, पाण्याच्या कॅन साहित्य याला नुकसान पोहोचवत यांची नासधूस केली.
त्यानंतर शिवसैनिकांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकातील विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. पहिल्या घटनेच्या अगदी दहा मिनिटांनी 10.30 च्या सुमारास शिवसैनिक पांडे मोबाईल शॉपीजवळ पोहोचले. त्यावेळी ते दुकान सुरू होते. शिवसैनिकांनी लगेच घोषणा देत या मोबाईल शॉपीवर हल्लाबोल केला. या दुकानात त्यांनी दुकानातील काउंटर तसेच एसी इत्यादी साहित्याची तोडफोड केली व दुकानातील कुलर बाहेर काढून फेकले.
वणी पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती आटोक्यात
रसवंतीवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांना आता पांडे मोबाईल शॉपीवर हल्ला होण्याची कल्पना आली. त्यामुळे पोलिसांचा ताफा वेळेचा विलंब न करता लगेच जटाशंकर चौकात पोहोचला. त्यांनी लगेच तिथे असणारे विश्वास नांदेकर व सुमारे 10-15 शिवसैनिकांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले. जर पोलीस वेळेत पोहोचले नसते तर आणखी नुकसान झाले असते अशी बोलले जात आहे.
या घटनेमुळे वणीतील राजकीय, सामाजिक क्षेत्र ढवळून निघाले आहे. याबाबत मिश्र प्रतिक्रिया येत आहे. माफी मागितल्यानंतरही दुकानाची तोडफोड करायला नको होती असा एक मतप्रवाह आहे. तर दुसरीकडे आक्षेपार्ह पोस्ट टाकणा-या पैकी एका व्यक्तीवर याआधीही एका प्रकरणात तक्रार दाखल केली जाणार होती. मात्र वातावरण चिघळू नये म्हणून वणीतील काही सुजाण नागरिकांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्या व्यक्तीला समज देऊन सोडून देण्यात आले होते. ही पार्श्वभूमी असतानाही अशा आक्षेपार्ह पोस्टवर स्वतःहून आवर घालायला पाहिजे असा दुसरा मतप्रवाह आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.