चामडे गेले तरी आयुष्य वाजत आहे, ….. हरवत चालली डफड्यांची परंपरा

0
17

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्नाचं तोरण असो की, मरण असो बॅण्डवाले असतातच. त्यांच्याशिवाय आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाचे क्षण व प्रसंग अर्धे वाटतात. साडे-तीन चार फूट व्यास असलेले डफडे पूर्वी खेड्यापाड्यांमधून दिसायचे. किंबहुना मंगलवाद्यदेखील हेच असायचे. सनईसारखी दोन सुशीर वाद्ये सोबतीला असायची.

एका सुशीर म्हणजे फुंकून वाजविता येणाऱ्या वाद्याने गाणं वगैरे वाजवायचं. दुसरं वाद्य तानपुऱ्यासारखं कायम स्वर देत राहतं. तालासाठी सोबतीला दोन किंवा अधिक डफडे. हे वरातीत असलं की पूर्वीची खेड्यापाड्यांतील वरात धमाल असायची. अलीकडचं डीजेवगैरे याच्यासमोर काहीच नाही.

खेड्यांधील सेलिब्रेशनसाठी डफडे हाच एकमेव पर्याय होता. पोळा, दिवाळी, होळी अशा अनेक सणांना हे डफडेवाले घरोघरी जाऊन वाजवायचे. लोक त्यांना धान्य व पैसा द्यायचे. आताही काही खेड्यांमधून ही परंपरा सुरूच आहे. हा डफडेवाला शक्यतो गावातलाच असतो. त्यामुळे कुणाच्या घरी लग्नकार्य वगैरे असलं की, जवळपास आठवडाभर याची सेवा कायम असते.

न्हाणोरा व इतर पूजा असली, की घरातलं एखादं लेकरू पळत जाऊन या डफडेवाल्याला बोलावून आणायचं. हा एकटाच वाजवत असला तरी त्याचं सेलिब्रेशन जबरदस्त व्हायचं. आज अनेक साधने आलीत. मोठमोठाले स्पीकर बॉक्सेस आपण घरीच वापरतो. गाड्यांमधील म्युझिक सिस्टमही भन्नाट वाजतात. पण या डफड्यांना एक संस्कृती आहे. एक परंपरा आहे. पिढ्यांपिढ्या आपली वंशपरंपरागत सेवा हे लोककलावंत देत असतात.

केवळ विविध प्रसंगांना डफडे वाजवून यांचा उदरनिर्वाह पूर्वी व्हायचा. आता क्वचितह पाच-सहाशे रूपये मानधन कधी कधी यांना मिळतं. आधुनिकीकरणाच्या नावाखाली आता सगळं बदललं. अगदी 200-3000 किलोमिटरवरूनदेखील डिजेवाली बॅण्डची गाडी खेड्यापाड्यांमध्ये पोहचली. या टेक्नॉलॉजीच्या आवाजात हा पारंपरिक सूर हरवत जातो.

डिजे, इलेक्ट्रॉनिक व डिजिटलमध्ये सेलिब्रेशन्स सुरू झालेत. पारंपरिक डफडे मात्र शेणाने सावरलेल्या भिंतीवरील गंजलेल्या खिळ्यालाच अडकलेले असतात. प्रसंग आला की निघतात बाहेर. पण असे प्रसंग पूर्वीसारखे नियमित येत नाहीत.

पूर्वी लाकडाची मोठी रिंग असायची. त्यावर चामडे लावून हे डफडे तयार होत. हे लाकूड गेलं. नंतर लोखंडाची रिंग आली. पुढे चालून या डफड्यातील चामडंही गेलं. आता पांढरे शूभ्र प्लास्टिकच वापरतात. नट, बोल्ट असलेल्या रेडिमेड फ्रेम्स आल्यात. डफड्यांमध्ये बदल होता होता डफडं पूर्णच बदललं. पांढरे शूभ्र धोतर घातलेला गावातील प्रतिष्ठित बुजूर्ग जिन्स व टीशर्टमध्ये दिसावा तसंच काहीतरी दिसत आहे. डफडे हरवले.. पूर्णच हरवले.

आता केवळ डफडे वाजवून पोटही भरत नाही. जगण्याच्या कक्षा रुंदावल्यात. पोटापाण्यासाठी जोडधंदा म्हणून हे डफडे वाजवले जातात. कोणी शेती, कोणी शेतमजुरी तर कोणी खाजगी ठिकाणी कामं करतात. काहीजण नोकऱ्यांमध्ये गुंतलेत. डफड्यामध्ये पूर्वी चामडे असायचं. हे चामडं असायचं म्हणून ते डफडं जिवंत असायचं. डफड्यांची प्लास्टिक सर्जरी झाली. त्याचं मूळ सौंदर्य हरवलं. प्लास्टिक सर्जरी झालेली व्यक्ती आकर्षक दिसते, मात्र सुंदर असेलच असं नाही. काहीजण केवळ परंपरा आहे म्हणूनच हे डफडे वाजवण्याचं काम जोपासतात.

त्या डफड्यावरील कातडी ही त्यांच्या आयुष्याची व जगण्याचीच असते. या डफड्यावरील चामडी गेली तरी जगणं अजूनही वाजत आहे. अगदी तालात. हा ताल जिव्हाळ्याचा आहे….. सूर आपुलकीचा आहे….. आणि संगीत जगण्याचं आहे…..
चामडे गेले तरी आयुष्य वाजत आहे
मी जीवनाच्या मैफलीत गाजत आहे….

.
सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606

Relief Physiotherapy clinic
Previous articleमारेगावात जोरदार पाऊस तर वणीतही लावली पावसाने हजेरी
Next articleसर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात तीन जोडपे विवाहबद्ध
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...