मारेगावात जोरदार पाऊस तर वणीतही लावली पावसाने हजेरी

उकाड्याने त्रस्त जीवांना क्षणिक दिलासा 

0

 वणी-मारेगाव-झरी प्रतिनिधी- मारेगाव शहरात शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. अनपेक्षित आलेल्या पावसाने अनेकांना सुखाचा धक्काच दिला. दगडी कोळश्यांच्या खाणी असलेला हा परिसर आहे. जीव होरपळावा असा उकाडा व तापमान नेहमीच्याच उन्हाळ्यात असते. पण अचानक आलेल्या या पावसोन क्षणभर का होईना उन्हाने त्रस्त झालेल्या जीवांना सुखद दिलासा मिळाला. काही प्रमाणात उकाड्यापासून सुटका मिळाली.

 

   गेल्या आठवड्यापासून यवतमाळ जिल्हासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस येत आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातही जवळपास रोजच ढग दाटून यायचे. जोरदार हवा व काही प्रमाणात पाऊस येत असल्यामुळे वातावरणात रात्री गारवा तर दिवसा उकाडा अनुभवास मिळत आहे. शुक्रवारच्या सकाळपासूनच आकाशात काळे ढग दाटले होते आणि अचानक दुपारी चारच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली.

 

उकाडा व गारवा या हवामानाच्या बदलामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आजार बळावले आहेत. थंड पेय, कलिंगड आदी फळे, उसाचा व इतर फळांचे रस, बाजारपेठा अशा अनेक घटकांवर या पावसाचा परिणाम होत आहे. पावसाच्या अचानक येण्याने वीज पुरवठा कधीही व कितीही वेळा बंद पडतो. उन्हाळ्याच्या या कठीण दिवसांमध्ये वृद्ध व तान्ही बालके यांची गैरसोय होत आहे. असे असले तरी उन्हाळ्याच्या सुट्यांचा आनंद घेणारी बालके या पावसाचेही स्वागत करून आनंद घेत आहेत.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!