दहेगाव(घोंसा) शाळेला अद्याप शालार्थ पासवर्ड मिळालाच नाही

क्रीडा सामन्यात महिला शिक्षिकेवर शिंतोडे उडविण्याचा प्रकार

0

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील दहेगाव(घोंसा) येथील जिल्हा परिषद शाळेचा शालार्थ, स्टुडंट, स्कुल पासवर्ड नवीनच प्रभार घेणाऱ्या मुख्याध्यापकाला उपलब्ध करून न दिल्याने शिक्षकांचे पगार थांबले आहेत. त्यामुळे तेथील शिक्षकावर उपासमारीची पाळी आली आहे. सोबतच पंचायत समिती शिक्षण विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील संबंधित प्रशासन मात्र ढिम्मच आहे.

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा दहेगाव(घोन्सा)चे तत्कालीन मुख्याध्यापक विजय पाटील यांचे समायोजनानंतर त्यांच्या कडील प्रभार हरिहर निमसटकर यांचेकडे हस्तांतरी करण्यात आला होता. सोबतच शाळेचे पासवर्ड देण्यात आले होते. त्या पासवर्डमध्ये शालार्थचा पासवर्ड समाविष्ठ नव्हता. मिळालेले पासवर्ड आधीच आधीच बदलविल्या गेल्याचे निमसटकर यांच्या लक्षात आले.

 

ही बाब गटशिक्षणाधिकारी पं.स वणी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी रितसर तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुकुटबन पोलीस स्टेशन येथे पासवर्ड बदलविल्या गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. परंतू पासवर्ड ज्या ठिकाणी बदलला ते स्थळ मुकुटबन पोलिसांच्या हद्दीत येत नसल्याने सदर तक्रार वणी ठाण्यात वर्ग करण्यात आली.

त्यानंतर शालेय कामकाज नियमित करण्याच्या दृष्टीने पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात यावे अशी विनंती गटशिक्षणाधिका-यांना करण्यात आल्यानंतरही शालर्थचा पासवर्ड मिळवून देण्यास सहकार्य मिळाले नाही. प्रशासनाला सर्वघटनाक्रम माहीत असूनही माहे नोव्हेबर 2017 चे वेतन काढून देण्यास सहकार्य मिळाले नाही. परिणामी सर्वच शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागले आहे. शिक्षण विभाग अडलेले वेतन काढून देणार की नाही .असा प्रश्न आता शिक्षकापुढे उभा आहे.

सदर प्रकरणाची मुकुटबन पोलिसांनी तपासणी केली तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली. यात ज्या व्यक्तीने पासवर्ड बदलला त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक नमूद असल्याचा स्क्रीन शॉट सुद्धा काढण्यात आला आहे. यावरून सदर प्रकरण कोणते वळण घेईल ही येणारी वेळच ठरवेल मात्र सध्यातरी या पासवर्ड च्या हेरफेरीत दहेगाव येथील शिक्षक पगारापासून वंचित राहिले आहे.

या प्रकरणात वणीचा शिक्षण विभाग केवळ कागदी घोडे नाचवीत फिरत आहेत. मुख्याध्यापकाला पासवर्ड दिल्याचे स्मरण करून देण्यात व्यस्त आहे. शिक्षण विभाग पासवर्ड हेरफेरीची चौकशी न करता संबंधित पासवर्ड हेराफेरी करणाऱ्याला जणू पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच या भिजत घोंगड्यात मात्र सामान्य शिक्षक वेठीस धरल्या जात आहे. संबंधित मुख्याध्यापक वारंवार येरझारा घालत असून त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून होत आहे.

घोंसा क्रीडा सामन्यात महिला शिक्षिकेवर शिंतोडे उडविण्याचा घाणेरडा प्रकार

नुकत्याच घोंसा येथे झालेल्या क्रीडा सामन्यात पंच म्हणून असलेल्या शिक्षिकेवर शिंतोडे उडविण्याचा घाणेरडा प्रकार करण्याची मजल ही मारली असल्याची चर्चा आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महिला शिक्षक झटताना दिसत असतानाच विकृत मानसिकता असलेल्या एका शिक्षकाने उलटसुलट चर्चा सुरू करीत संबंधित महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. मात्र येथील शिक्षण विभाग केवळ सांगकाम्या असल्याचे सोंग रचून बघ्याची भूमिका बजवीत आहे. तालुक्यातील मंदर, साखरा पोड आदी शाळेवरील प्रकाराची चौकशी सुद्धा थंडबस्त्यात आहे. मंदर शाळेवरील शिक्षिकेला वेठीस धरण्याचा प्रकार सुध्दा याआधी घडला आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला असताना स्थानिक पदाधिकारी सुद्धा गप्प बसून असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.