भास्कर राऊत, मारेगाव: मित्राच्या मयतीला गेलेल्या एका व्यक्तीवर स्वतःचा जीव गमावून बसण्याची वेळ आल्याची घटना तालुक्यातील दांडगाव येथे घडली असून एकाच दिवसातील दोन मृत्यूने गाव मात्र हादरून गेले आहे. नदीमध्ये बुडून मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव पंढरी भाऊराव चिंचोलकर वय अंदाजे 38 वर्षे असे आहे.
सविस्तर वृत्त असे की, काल दि. 13 ऑगस्टला दांडगाव येथील प्रफुल गजानन मत्ते, वय अंदाजे 24 वर्षे या युवकाने वर्धा नदीवर असलेल्या बंधाऱ्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मयतीसाठी गावातील व्यक्ती व पाहुणे हे आज दि.14 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीवर गेले होते. प्रफुलचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर काही लोक लागूनच असलेल्या नदीमध्ये अंघोळीला गेले होते.
अशातच पंढरी हे सुद्धा इतर लोकांसोबतच अंघोळीला नदीत उतरले. नदीमध्ये डोह असल्याची कल्पना नसलेल्या पंढरी हे नदीमध्ये गटांगळ्या खाऊ लागले. तिथे काठावर असलेल्या लोकांच्या लक्षात ही बाब येताच काही मंडळी मदतीसाठी धावली. परंतु पाणी खूब खोल असल्याने आणि पंढरी खोलात जात असल्याने त्यांचा नाईलाज झाला.
अशातच तिघा चौघांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तेही प्रवाहाच्या ओघात यायला लागताच काही नागरिकांनी ओढणीच्या साहाय्याने त्यांना बाहेर खेचल्याने समोरील अनर्थ टळला. नाहीतर एकाच्या जागी चार ते पाच जण मृत पावले असते. प्रफुलच्या मयतीला आलेल्या जवळपास 100 ते 150 लोकांच्या समोर घडलेल्या या ह्रदयदावक घटनेने परिसरात खळबळ माजली असून गावातील एकाच दिवशी दोघा जणांचे जीव गेल्याने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती गोरज येथील पोलीस पाटील प्रमोद ताजने यांनी पोलिसांना भ्रमणध्वनी वरून दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु अंधार पडायला सुरुवात झाल्याने आणि मृतदेह दिसत नसल्याने त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वृत्त लिहीपर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला नव्हता.
मृत व्यक्ती हा पोहणारा होता असेही कळते. पंढरीच्या मागे आईवडील, पत्नी , एक मुलगा व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे.
हे देखील वाचा:
मार्डाजवळील नदीतील डॅममध्ये उडी घेऊन दा़ंडगावच्या तरुणाची आत्महत्या
मयूर मार्केटिंगमध्ये ऑनलाईनपेक्षाही कमी किमतीत वस्तू उपलब्ध… भव्य सेल सुरू