पाटण व मुकुटबन पोलिसांनी केली हातभट्टी नष्ट
शिबला आणि वाढोणा बंदीच्या जंगलात सुरू होती हातभट्टी
सुशील ओझा, झरी: वाढोणा बंदी आणि शिबला येथील जंगलात हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून 8 ड्रम दारू नष्ट केली. वेगवेगळ्या झालेल्या या घटनात पाटण आणि मुकुटबन पोलिसांद्वारा ही कारवाई करण्यात आली. यात 8 ड्रम दारू आणि सडवलेले मोहफूल पोलिसांनी नष्ट केले.
कोरोनाच्या दहशतीमुळे सध्या देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. बार व भट्टी बंद असल्याने तळीरामांची चांगलीच अडचण होत आहे. त्यांची तलब भागवण्यासाठी शिबला व वाढोणा बंदी येथील जंगलात हातभट्टीवर दारू काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुकूटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने व पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांना गुप्त माहिती मिळाली.
यावरुन सोनुने यांनी वाढोनाबंदी जंगल परिसरातील सुरू असलेल्या हातभट्टी वर धाड टाकण्याकरिता एएसआय सुरपाम पुरूषोत्तम घोडाम प्रवीण ताडकोकुलवार,नीरज पातूरकर रंजना सोयाम,राम गडदे रमेश मस्के याना पाठवीले.
तर ठाणेदार बारापात्रे यांना शिबला परिसरातील जंगलात मोहफुलची दारू काही इसम काढत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांच्यासह कर्मचारी व होमगार्ड यांना पाठविले. पोलीस येण्याची चाहूल लागताच मोहफुलची दारू बनविणारे लोक जंगलातून पळून गेले.
या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 8 ड्रम दारू मिळाली. शिबला येथे धाड टाकल्यानंतर पीएसआय मोरे यांनी गावातील महिला पुरुष यांनासुद्धा घेऊन सदर मोहफुल सोडविलेले ड्रम व पीपे फोडले व हातभट्टी नष्ट केली. पोलिसांच्या कारवाईने अवैध हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहे.