पाणीटंचाईने दूर केल्यात आजारांच्या समस्या ?

0

सुनील इंदुवामन ठाकरे: सध्या वणीकर जीवघेणी पाणीटंचाई अनुभवत आहेत. पाण्याच्या एकेक थेंबासाठी सर्वांचीच धावपळ सुरू असते. नळ कधी येतात, तर कधी नाही. अशा भीषण परिस्थितीत एक गोष्ट मात्र चांगली घडली. ती म्हणजे पाण्यापासून होणारे अनेक आजारच टळलेत.

उन्हाळा म्हटलं की, डायरिया, कॉलरा वगैरे आजारांचे प्रमाण वाढते. दूषित पाणी प्यावे लागत असल्यामुळे अनेकांना या आजारांना सामोरे जावे लागते. शहरात विहिरींचे पाणी पिण्यासाठी वापरणारे तसे फार कमी आहेत. नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अपुरा असल्यामुळे शक्यतो अनेकजण पिण्यासाठी कॅन्स विकत घेतात. वैद्यकीदृष्ट्या 100 टक्के वगैरे शुद्धता यात नसते. मात्र नळाचे अलीकडे मिळणारे अथवा विहिरींचे पाणी यांच्या तुलनेत हे पाणी बरेच असते. जवळपास उन्हाळ्याच्या आरंभापासूनच विकतचे पाणी घ्यायला लोकांनी सुरुवात केली. हे विकतचे पाणी बऱ्यापैकी स्वच्छ असते. त्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे होणारे अनेक आजार या उन्हाळ्यात वणी शहरात दिसलेच नाहीत. क्वचितच एखाद- दुसरा रुग्ण आढळला तर आढळला.

रोज पिण्यासाठी खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत असले तरी, आरोग्याच्या अनेक समस्यांतून नागरिकांची सुटका झाली हे एका औषधीनिर्माता असलेले राजाभाऊ गौरकार यांनी वणी बहुगुणीजवळ सांगितले. एरवी कुठेही पाणी पिणारे वणीकर आता मिनरल वॉटरच्या सिलबंद बाटल्यांचाच आधार घेताना दिसतात. प्रवासातदेखील लहान लेकरं म्हणा की सर्वच जण पिण्यासाठी हे बाटलीबंदच पाणी वापरतात. त्यामुळे अशुद्ध पाणी शरीरात जाण्याचा प्रश्नच येत नाही.

पूर्वी उन्हाळ्यात होणाऱ्या लग्न किंवा इतर सार्वजनिक कार्यात मोठमोठाले ड्रम्स वापरले जायचे. यात पाण्याच्या टाकीवरून आणलेले किंवा विहिरीचे पाणी असायचे. आता ती पद्धतच जणू बंद झाली. गार पाण्याच्या कॅन्स विकत मिळायला लागल्यापासून अशा सार्वजनिक कार्यांमध्येदेखील दूषित पाणी राहत नाही. डॉ. महेंद्र लोढा यांनी शहरात अनेक ठिकाणी आर. ओ. वॉटरची व्यवस्था पाणपोयांसह केली आहे. जवळपास सर्वच व्यावसायिक आपल्या दुकानांमध्ये पिण्यासाठी अशा कॅन्सचाच वापर करतात. जवळपास घरोघरी आता या कॅन्सचाच वापर होत आहे.

रोज कॅन्स घेण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. मध्यमवर्गीयांच्या महिन्याच्या बजेटवर त्याचा प्रभाव पडतो. असे असले तरी वाईटातलं चांगलं पाहावं म्हणतात, या उक्तीप्रमाणे या गोष्टीकडे पाहता येईल. सर्वत्र आर. ओ., बाटलीबंद किंवा कॅन्सच्या पाण्याचा वापर वाढल्याने आजारांचे प्रमाण हे नगण्यच आहे. खर्च झाला तर होऊ दे; पण आरोग्य उत्तम मिळत आहे यावरच वणीकरांनी समाधान मानायला काही हरकत नाही. पाणीटंचाई आली बरेच झाले, किमान आजाराच्या समस्या तर मिटल्यात असे काहीजण गमतीने म्हणत आहेत.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.