जागतिक कीर्तीचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे शनिवारी वणीत मोफत व्याख्यान
मधुमेह, पोटावरची चरबी आणि अनेक समस्यांवरती निःशुल्क समाधान
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आजच्या धावपळीच्या युगात अनेक नवनव्या आरोग्यविषयक समस्या उभ्या राहत आहेत. कोणत्याही वयात होणारा मधुमेह हा काळजीचा विषय बनला आहे. अनियंत्रित खानपान आणि बदलत्या लाईफस्टाईलमुळे लठ्ठपणा, पोटावरची वाढलेली चरबी अशा अनेक समस्यांनी लोक त्रस्त आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मोफत व्याख्यान तालुका डॉक्टर्स असोसिएशनने डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकारात शनिवार दि. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचे मोफत व्याख्यान आयोजित केले आहे.
स्थानिक शेतकरी मंदिर परिसरातील वसंत जिनिंग लॉन्स येथे हे व्याख्यान होत आहे. वणी, मारेगाव आणि झरी तालुका डॉक्टर्स असोसिएशनने डॉ. महेंद्र लोढा यांच्या पुढाकारात या निःशुल्क व्याख्यानाचे आयोजन केले आहे. वाढते वजन आणि मधुमेह यांवरील उपचार करणे अत्यंत कठीण व क्लेशदायी काम आहे. मात्र अत्यंत सोप्या पद्धतीने यावर नियंत्रण कसे मिळवावे याचे निःशुल्क मार्गदर्शन डॉ. दीक्षित करतील. पोटावरील वाढलेली चरबी, मधुमेहाचा त्रास, निरुस्ताह यावर मात करून निरामय आरोग्य कसे जगावे याची माहिती डॉ. दीक्षित त्यांच्या व्याख्यानात देतील.
यात कोणताही खर्च नाही. कोणतेही डायट सप्लिमेंट विकत घ्यावे लागत नाही. कोणतेची यंत्र किंवा मशीनचादेखील खर्च नाही. काही सोप्या पद्धतीने यावर नियंत्राचे उपाय सांगितले जातील. वणी शहरात पहिल्यांदाच हे मोफत व्याख्यान होत आहे. त्यामुळे गर्दी लक्षात घेता नागरिकांनी वेळेपूर्वी व्याख्यानाला हजर राहावे. सामाजिक कार्यकर्ते व असोसिएशनचे डॉ. महेंद्र लोढा, डॉ. शिरीष ठाकरे, डॉ. महाकुलकार, डॉ. रमेश सपाट, डॉ. वडोदेकर, डॉ. मत्ते, डॉ. एकरे, डॉ. विकास हेडाऊ, डॉ. पारशिवे, डॉ. कुमरवार, डॉ. निमजे, डॉ. जुनगरी, डॉ. राहुल खाडे, डॉ. डाखोरे, डॉ. झाडे व असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याची विनंती केली आहे.