जितेंद्र कोठारी, वणी: क्रशर कंपनीतील लोडर ऑपरेटरने निष्काळजीपणे लोडर चालवुन दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला युवक जखमी झाला. सदर अपघात शिरपूर पोलिस ठाणे अंतर्गत मोहदा (वेळाबाई) येथील साई मिनरल्स कंपनी मध्ये गुरुवारी रात्री 9.30 वाजता दरम्यान घडला. प्रशांत पांडे (32) रा. बिहार ह.मु. मोहदा असे या अपघातात मृत युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील राजू बियाणी यांची मोहदा येथे साई मिनीरल्स कंपनी या नावाने क्रॅशर प्लांट व गिट्टी खदान आहे. गुरूवार दि. 22 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वाजता दरम्यान कंपनीत इलेक्ट्रिशियन काम करणारा प्रशांत पांडे व सनी विश्वकर्मा हे दोघे (MH29 BH0983) या दुचाकीने ड्युटीसाठी कंपनीत येत होते. दरम्यान ट्रकमध्ये गिट्टी भरणाऱ्या लोडरचे ऑपरेटर आकाश प्रकाश पाटणकर (25), रा. पांढरपोहणी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर हा लोडर चालवत होता.
निष्काळजीपणे लोडर चालवताना लोडरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक प्रशांत पांडे हा गंभीर जखमी झाला. तर मागे बसलेला सनी विश्वकर्मा (22) हा किरकोळ जखमी झाला. दुर्घटनेनंतर फिर्यादी यांनी कंपनीतील इतर कामगारांना सोबत घेऊन जखमी प्रशांत पांडे याला पीकअप वाहनात वणी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
फिर्यादी रोहित भुवन विश्वकर्मा रा. मोहदा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसानी आरोपी लोडर ऑपरेटर आकाश प्रकाश पाटणकर (25), रा. पांढरपोहणी, ता. राजुरा, जि. चंद्रपूर विरुद्ध कलम 279, 304 (अ) भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
गिट्टी क्रॅशर कंपन्यात अनेक अनियमितता
मोहद येथील गिट्टी क्रॅशर कंपन्या व गिट्टी खदानी मध्ये नियमबाह्य कार्य सुरु असताना प्रशासन मौन आहे. नियमानुसार सायंकाळी 6 वाजेनंतर खाणीतून दगड वाहतूक, लोडिंग अनलोडिंग बंद ठेवावी लागतात. मात्र साई मिनरल्स कंपनीत नियम धाब्यावर बसवून रात्रंदिवस दगड व गिट्टी वाहतूक केली जाते. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम मोडून क्रॅशर प्लांट चालविले जात आहे.
Comments are closed.