टिळकचौकातील फुटपाथवरील अतिक्रमण उठवले, वणीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

वणी नगरपालिकेची प्लॅस्टिक निर्मूलन व अतिक्रमण विरोधात धडक कारवाई.... प्लॅस्टिक पन्नी विक्रेत्यांकडून 25 हजार रुपये दंड वसूल

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण व त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने वणी नगरपरिषेने सोमवार 15 नोव्हेंबर पासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी पोस्ट ऑफिस ते पाण्याची टाकी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने बेकायदेशीर टपऱ्या व भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. नगर परिषदचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या मदतीने फुटपाथवरील केलेले पक्के अतिक्रमण जमीनदोस्त केले.

वणी शहराचे झपाट्याने होत असलेले विस्तारीकरण व रस्त्यांवरील अतिक्रमणमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने पालिका मुख्याधिकारी यांना पत्र देऊन अतिक्रमण काढण्याची विनंती केली. त्या अनुषंगाने वणी नगरपालिकेने सोमवार पासून बेकायदेशीर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.

आणखी आठ दिवस चालणार मोहीम
वणी नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुढील आठ दिवस सुरु राहणार असून टिळक चौक, बस स्थानक परिसर, आंबेडकर चौक, गांधी चौक, वरोरा रोड, विराणी टॉकीज रोड, यवतमाळ रोडवरील बेकायदेशीर अतिक्रमण तोडण्यात येणार आहे. अतिक्रमण हटाव मोहिम जेसीबी मशीन घेऊन पोहचताच बहुतांश अतिक्रमणधारकांनी स्वतःहुन टपऱ्या हटविण्यात सुरुवात केली. पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यांनी आज मोकळा श्वास घेतला.

अतिक्रमण धारकांनी स्वतःहुन अतिक्रमण काढून घ्यावे – मुख्याधिकारी
शहरातील बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण आहे. त्यामुळे वाहन चालक, पादचारी यांना अनेक अडचणीला तोंड द्यावे लागते. शिवाय वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कार्यवाही एक आठवडा किंवा त्यापुढेही सुरु राहणार आहे. अतिक्रमणधारकांनी आपले नुकसान टाळण्यासाठी स्वतःहुन आपले अतिक्रमण काढून घ्यावे.
– अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी

प्रतिबंधित प्लास्टिक विक्रेत्यांवरही कारवाईचा सपाटा
30 सप्टेंबर पासून संपूर्ण देशात 75 मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पन्नी व सिंगल युज प्लॅस्टिक व थर्मोकॉलच्या वस्तूंवर प्रतिबंध लागू करण्यात आले आहे. मात्र प्रतिबंध झुगारून अनेक व्यावसायिक, किरकोळ व्यापारी, पानटपरी चालक, फळभाजी विक्रेते, मटण चिकन विक्रेता, कॅटरिंग व्यावसायिक पातळ कॅरीबॅग, खर्रापन्नी, थर्माकॉलच्या ताट, वाटी, ग्लास सर्रास वापरताना दिसत आहे. नगरपालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी मोहीम राबवून मागील 8 दिवसात 25 हजार रुपये दंड वसूल केले आहे.

Comments are closed.