ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या प्रकरणानं जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. अनेक शेतकरी शेतमजुरांचा यात मृत्यू झाला तर अनेकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतांना आणि बाधित रुग्णांना शासनातर्फे मदतही जाहीर करण्यात आली आहे. मात्र सध्या एका खोट्या विषबाधित रुग्णानं हॉस्पिटलच्या कर्मचा-याची चांगलीच झोप उडवली आहे. हा व्यक्ती दर वेळी फवारणी करताना विषबाधा झाल्याचं कारण सांगून रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचा मात्र नंतर माहिती पडायचं की तो रुग्ण नसून दारुडा आहे व दारूच्या नशेत तो दरवेळी दाखल व्हायचा. एकदा नाही तर दोनदा हा बनावट विषबाधित रुग्णालयात दाखल झाला आणि दारुची झिंग उतरल्यावर त्याने पलायन केले.
मारेगाव तालुक्यातील सिंदी महागाव या गावातील एक इसम फवारणीतून विषबाधा झाली म्हणून उपचार घेण्यासाठी मारेगावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. आधीच हे प्रकरण तापले गेले असल्याने रुग्णालयात तडकाफडकी कामाला लागले. या इसमाचं नाव अमोल रमेश ठावरी असून तो 22 वर्षांचा आहे. अमोल रुग्णालयात दाखल होताच रुग्णालय प्रशासन उपचारासाठी सज्ज झालं. त्याने फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याचे कारण सांगितले. त्याच्या सांगण्यावरून त्याच्यावर तिथं उपचार सुरू करण्यात आले. मात्र तपासणी अंती त्याला कोणतीही विषबाधा झाली नसल्याचे समोर आले. त्याला या बाबत विचारणा करण्यात आल्यावर त्याने काहीही उत्तर दिले नाही. पुढे सिस्टरचे लक्ष नसताना त्याने तिथून पोबारा केला.
पेशंट पळून गेल्याने रुग्णालयात एकच ताराबळ उडाली. नंतर पुन्हा हाच इसम पुन्हा फवारणी करताना विषबाधा झाल्याचे कारण सांगून रुग्णालयात दाखल झाला. सिस्टरने त्याच्या नावाची नोंद केली. त्याला तपासल्यानंतर लक्षात आले की त्याला कोणतीही विषबाधा झाली नव्हती. तर तो दारू पिऊन आला असल्याचे सिस्टरला आढळले. या तळीरामाच्या वर्तनाने रुग्णालयातील यंत्रणा काही काळ प्रभावीत झाली. तिथं उपस्थित असलेल्या एनजीओच्या कर्मचा-यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा तो रुग्णालयातून पळून गेला,
एकीकडे फवारणी विषबाधातून सर्वीकडे खळबळ माजली असताना आता शासनाची मदत मिळेल म्हणून कोणी काय क्लृप्त्या योजीत आहे. आता हा रुग्ण दारुच्या नशेत रुग्णालयात दाखल झाला होता की शासनाची विषबाधीत शेतक-याला मिळणा-या मदतीसाठी दाखल झाला होता. हे गुलदस्तातच आहे.