तरुण शेतकऱ्याने मूरमाड जमिनीवर फुलवली शेती
सुनील इंदुवामन ठाकरे, यवतमाळ: मुरमाड पडीक जमिनीला काळी कसदार करून नंदनवन करण्याची किमया तरुण शेतक-याने केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन या तरुणाने फळवर्गीय आणि भाजीपाल्याची लागवड शेतीत केली आहे. यातून वर्षाकाठी त्याला निव्वळ नफा 6 लक्ष रुपये होत असून फळविक्रितून दरमहा हातात पैसा राहत आहे.
शिवशंकर मारोती वाटोळे (35) असे या उपक्रमशील तरुण शेतक-याचे नाव आहे. महागाव तालुक्यातील कावरवाडी (इजारा) येथे त्याची 13 एकर शेती आहे. मूळचा पुसद तालुक्यातील सेलूवाडी येथील रहिवासी असलेल्या शिवशंकरने 2011 मध्ये कावरवाडी येथे शेती विकत घेतली. संपूर्ण मुरमाड, पडीक असेच चित्र होते. या जमिनीलाच काळी कसदार करण्याचा त्याने चंग बांधला. पाच-पन्नास नव्हे तर तब्बल 200 ट्रॅक्टर काळी माती जमिनीवर टाकून त्याला समतल केले. बांध काढून संपूर्ण जमिनीचा उतार ज्या भागात एकत्र येतो तेथे विहिर खोदली. पहिल्या वर्षी विहिरीला पाणी लागले नाही म्हणून शेतात बोअर केली. यातून हिरवाईचे स्वप्न दृष्टीक्षेपास पडू लागले. वैशिष्ट म्हणजे बोअर आणि विहिरीच्या माध्यमातून जेवढे पाणी शेतीला आवश्यक आहे, तेवढे घेतल्यानंतर उर्वरीत सर्व पाणी पुन्हा विहिरीत जमा होत आहे. त्यामुळे दुष्काळाच्या या परिस्थितीतही विहीर पुनर्भरणामुळे शिवशंकरची शेतील बारामाही बहरत आहे.
2012 पासून शिवशंकर कृषी विभागाच्या संपर्कात आहे. सुरवातीला पाच एकरामध्ये कृषी विभागाने दोन लक्ष रुपये अनुदान देऊन ठिबक सिंचनाचा लाभ दिला. यावेळी तालुका कृषी अधिकारी रणवीर यांनी फळबाग लागवडीची संकल्पना समजून सांगितली. शिवशंकरनेही लगेच होकार देऊन आपण पारंपरिक शेतीपेक्षा वेगळे काहीतरी करू, असे ध्येय ठेवले. आज स्वत:च्या मेहनतीवर शिवशंकरने संपूर्ण शेतीत सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. तुती (रेशीम लागवड) चे बेणं तयार करून त्याची लागवड शेतीत केली आहे. एक एकरामध्ये शिवशंकरने सिताफळ लावले असून त्यात आंतरपीक म्हणून कारले, टमाटर, दोडक्याची लागवड केली आहे. मनरेगामधून सव्वा एकर शेतात संत्राची बाग लावण्यात आली असून यात आंतरपीक म्हणून भेंडी, ढेमस, टमाटर अशी पिके लावण्यात आली आहे.
गत दोन – अडीच महिन्यात शिवशंकरने एका एकरात पत्ताकोबीची दहा हजार झाडे लावली. एकरी केवळ 15 हजार रुपये खर्च करून 100 क्विंटल पत्ताकोबीचे उत्पादन घेतले आहे. उमरखेड, माहूर, पुसद येथे पत्ताकोबीची हातोहात विक्री केल्यानंतर त्याला निव्वळ नफा 50 हजार रुपये झाला आहे. शिवशंकरच्या शेतात अडीच एकरावर डाळींब तर दीड एकरात केळीचे 1400 झाडे आहेत. विशेष म्हणजे व्यापारी केळीच्या बागायतीमध्ये प्रत्यक्ष गाडी घेऊन जागेवर केळी खरेदी करतात. केळीचे बेणं बागायतीमध्ये तयार होत असल्याने पुढील हंगामात त्याचा अतिरिक्त खर्च येत नाही. दीड एकर केळीकरीता शिवशंकरला केवळ 50 हजार रुपये खर्च आला. तर सरासरी 20 किग्रॅचा फड 200 रुपयाला याप्रमाणे संपूर्ण केळीतून यातून त्याला दोन लक्ष रुपयांचे उत्पन्न येण्याची शक्यता आहे.
शिवशंकरने एका एकरमध्ये पेरुची 400 झाडे लावली आहेत. ही झाडे जालन्यावरून आणली असून यात आंतरपीक म्हणून त्याने चवळीची लागवड केली आहे. लंगडा, केशरी, दशहरी आंब्याची 20 झाडे, जांभूळ, चिकू सोबतच बांधावर फणस व इतर पिके घेतली आहे. आज शिवशंकरच्या शेततात फणसाची 20 झाडे, शेवगाची 30-40 झाडे, जांभळाची 25 झाडे यासह दोडके, टमाटर, कोबी, चवळी, कारले, ठेमस, भेंडी, मिरची, आदी भाजीपाला असून पेरू, केळी, जांभूळ, निलगीरी, संत्रा, मोसंबी, डाळींब अशी फळवर्गीय पिके आहेत.
प्रत्येक एकराला जवळपास 50 हजार रुपये खर्च आणि त्यातून नफा एक ते दीड लक्ष रुपये याप्रमाणे शिवशंकरला वर्षाकाठी निव्वळ नफा साधारणत: 6 लक्ष रुपये होतो. विशेष म्हणजे आलेल्या पैशातून पुन्हा शेतीमध्येच गुंतवणूक करण्याला हे कुटुंब प्राधान्य देते. शेतीमध्ये वास्तव्य असणा-या शिवशंकरचे वडील मारोती वाटोळे, पत्नी यांच्यासह आजूबाजूचे सात-आठ मजूर रोज शेतीत राबतात. सातवी – आठवीमध्ये असणारी शिवशंकरची दोन्ही मुले उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतीत राबत होती. विशेष म्हणजे केवळ दहावी उत्तीर्ण असलेला शिवशंकर सहज म्हणून गेला, आजकालची तरुण पिढी फेसबुक, व्हॉट्सॲप वर रमते, आम्ही शेतीत रमतो, ही मायच आम्हाला जगविते.