शेतीच्या कामासाठी गेलेल्या शेतक-याची दुचाकी लंपास

शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मेनरोडवर ठेवली होती दुचाकी

बहुगुणी डेस्क, वणी: गौराळा फाट्याजवळून एका शेतक-याची दुचाकी चोरट्याने लंपास केली. बुधवारी दिनांक 30 जुलै रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या कामासाठी गेलेल्या शेतक-यांची दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतक-यांचे चांगलेच टेंशन वाढले आहे. 

तक्रारीनुसार, वणी तालुक्यातील निंबाळा रोड येथील रहिवासी आणि शेतकरी विठ्ठल रामचंद्र पिंपळशेंडे (वय 53) यांच्याकडे हिरो होन्डा स्प्लेंडर (क्र. MH-29-X-4655) ही मोटारसायकल आहे. ही मोटरसायकल घेऊन ते 30 जुलै रोजी सकाळी 11:00 वाजता आपल्या शेतात गेले होते. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आपली काळ्या रंगाची (निळ्या पट्ट्यांसह) 2009 मॉडेलची हिरो होन्डा स्प्लेंडर मोटरसायकल (किंमत अंदाजे 10,000 रुपये) गौराळा फाट्यावर एका शेताजवळ मेन रोडवर उभी केली होती.

दुपारी 3:00 वाजता शेतीचे काम आटोपून परतल्यानंतर त्यांना मोटरसायकल जागेवर आढळली नाही. आजूबाजूला शोध घेऊन आणि विचारपूस करूनही मोटरसायकल मिळाली नाही. या घटनेनंतर विठ्ठल पिंपळशेंडे यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

Comments are closed.