शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
शाळा क्र. 8 च्या 2 तर शाळा क्र. 1 ची 1 विद्यार्थीनीं गुणवत्ता यादीत
निकेश जिलठे, वणी: पाचव्या वर्गात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) परीक्षेच्या गुणवत्ता यादीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 ची कु. सोनू सुनील सातपुते व कु. दुर्गा नरेश गाडेकर या विद्यार्थीनी झळकल्या आहेत. तर महात्मा गांधी शाळा क्रमांक 1 ची कु. रामेश्वरी जीवन टेंभेकर ही विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत झळकली आहे. या विद्यार्थीनी सध्या 6 व्या वर्गात शिकत असून 5 व्या वर्गात असताना ही परीक्षा घेण्यात आली होती.
या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत सावित्रीच्या लेकीकाच डंका दिसून आला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकणा-या सर्व मुलीच आहेत. यात नगर पालिकेच्या शाळेतील 4 विद्यार्थीनींचा समावेश आहे. कु. सोनू सातपुते ही शहरातील रंगारीपुरा येथील रहिवाशी असून तिचे वडील नरेश हे सोन्याच्या दुकानात काम करतात. तर कु. रामेश्वरी जीवन टेंभेकर ही रंगनाथ नगर येथील रहिवाशी असून तिचे वडील जीवन हे मित्रीकाम करतात.
शेतमजुराची मुलगी गुणवत्ता यादीत
गुणवत्ता यादीत झळकलेली शाळा क्रमांक 8 ची विद्यार्थीनी दुर्गा गाडेकर हीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हे यश मिळवले आहे. तिचे वडील नरेश गाडेकर हे मारेगाव तालुक्यातील एका दुर्गम पोडातून आले आहे. ते शहरालगत असलेल्या कायर रोडवरील एका शेतात सालगडी म्हणून काम करतात व शेतातीलच बंड्यावर ते कुटुंबासह राहतात. शेतातील बंड्यावरून दुर्गा रोज 3 ते 4 किलोमीटरचे पायदळ अंतर कापून शिक्षण घेत आहे. सध्या ती सहाव्या वर्गात शिकत असून शाळेतील इतर ऍक्टिव्हीटीतही तिचा कायम सहभाग असतो.
कु. सोनू आणि दुर्गा यांना मुख्याध्यापक बंडूजी कांबळे व वर्गशिक्षक देवेंद्र खरवडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर कु. रामेश्वरी हिला मुख्याध्यापक शंकर आत्राम व वर्गशिक्षक एकनाथ लांबट यांचे मार्गदर्शन लाभले. गुणवत्ता यादीत झळणा-या या मुली त्यांच्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक व मुख्याध्यापक यांना देतात.
नगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थी प्रतिकुल परिस्थितीतून आलेले असतात. यातील अनेकांच्या घरी शिक्षणाचे वातावरण नसते. या परिस्थितीतही शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक त्यांचे विद्यार्थी शिक्षणात कुठेही मागे राहू नये यासाठी धडपडताना दिसतात. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मिळवलेल्या त्यांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
हे देखील वाचा: