मारेगाव तालुक्यातील शेतकरी अजूनही पिकविम्याच्या प्रतीक्षेत
फक्त 3 शेतकऱ्यांनाच मिळाली मदत,
भास्कर राऊत, मारेगाव: पिकविमा योजनेअंतर्गत मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीची भरपाई म्हणून विमा परतावा मिळावयास हवा होता. परंतु पूर्ण सत्रही लोटून गेले तरीही तालुक्यातील शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पिकविम्याची रक्कमच न मिळाल्याने शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम त्वरित मिळावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम धोबे यांनी विमा कंपनीला पत्र लिहून मागणी केलेली आहे.
मारेगाव तालुक्यात प्रधान मंत्री पीक विमा योजना अंतर्गत 2020 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 12 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केला. 18/9/2021 रोजी कंपणीमार्फत तालुक्यातील मार्डी शाखेतील 868 शेतकऱ्यांना 25 लाख 30 हजार एवढी रक्कम मंजूर करण्यात आली. यापैकी फक्त 3 शेतकऱ्यांसाठीची 7156 रुपये एवढी रक्कमच प्राप्त झाली. उर्वरित 865 शेतकऱ्यांना 25 लाख 23 हजार रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना प्राप्त होणे बाकी आहे. हा आकडा फक्त मध्यवर्ती सहकारी बँक मार्डीचा असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाच आकडा 12 कोटीच्या वर आहेत.
अनेक शेतकऱ्यांना जुनीच पिकविम्याची रक्कम मिळाली नसतांनाही शेतकऱ्यांनी चालू 2021 या वर्षाच्या विम्याच्या रकमेचाही भरणा केलेला आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, पिकांमध्ये आलेली कमी, बोंडअळी यामुळे वाया गेलेले कपाशीचे पीक, आणि दुष्काळामुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी मा. रिजनल मॅनेजर, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कम्पनी लिमिटेड, पुणे या कंपनीला मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक घनश्याम दादाजी धोबे यांनी केलेली आहे.
अज्ञानामुळे अनेक शेतक-यांची तक्रार नाही
एप्रिलमध्ये ज्या शेतकऱ्यांनी विम्याची रक्कम भरलेली होती व ज्यांना पिकविम्याच्या जाहीर झालेल्या मदतीमध्ये ज्यांचे नाव नव्हते त्यांना तक्रार करण्यास सांगितले होते. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली त्यांना नुकसानभरपाई मिळाली परंतु जे अज्ञानी शेतकरी आहेत, ज्यांना या सूचनांचे ज्ञान नसते ते शेतकरी मात्र या मदतीपासून वंचित राहिले. त्यामुळे जे शेतकरी या मदतीपासून वंचीत राहिले त्यांनाही मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
हे देखील वाचा:
मिलन लुथरियांचा बहुचर्चीत तडप सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला…
Comments are closed.