बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
खैरगाव-चिंचमंडळ येथील प्रकार, नुकसान भरपाई देण्याची मागणी
भास्कर राऊत, मारेगाव: बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे सदोष पद्धतीने काम केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. बेंबळाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले कपाशी व सोयाबीन बियाणे खरडून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत शेतक-यांमध्ये रोष असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
मागील काही वर्षांपासून मारेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाचे काम सुरु आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरु आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या प्रकल्पाचे काम केले जाते त्यांना कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता हे काम केल्या जात असल्याचा सुरुवातीपासूनच आरोप होत आहे. काही ठिकाणी तर या कामाचे कंत्राटदार शेतकऱ्यांना धमकावत, दमदाटी करीत काम करीत असल्याचा प्रकारही उघडकीस येत आहे. परंतु आपल्या शेतामधून गेलेल्या कालव्याचा आपल्याला नंतर फायदा होईल या आशेने अनेक शेतकरी ही कामे पूर्णत्वास जाऊ देत आहेत.
खैरगांव येथील शेतकरी विठ्ठल आनंदराव आवारी आणि पांडुरंग आनंदराव आवारी यांची खैरगांव शिवारात शेती आहेत. त्यांच्या शेतालगत पाटसऱ्या केलेल्या आहेत. परंतु त्या अपूर्ण आहेत. वारंवार सूचना करूनही त्या पाटसऱ्यांचे काम पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. पावसाचे पाणी पाटसरिनी वाहून जाऊ लागले. परंतु चुकीच्या पद्धतीच्या पाटसरी आणि शेवटी पाणी वाहून नेण्याची तोंडी बंद असल्याने त्या वाहून जाणाऱ्या पाटसरीचे संपूर्ण पाणी हे शेतकऱ्यांच्या शेतात शिरले.
पाहता पाहता शेतातील सुपीक मातीसहित पिके खरडून नेली. या कामाविषयीं वारंवार तक्रारी करूनही याची संबंधीत विभागातर्फे कोणतीही दखल घेतली जात नाही. पहिली पेरणी पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. याविषयी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केलेली आहे.
बेंबळा प्रकल्प उठलाय शेतकऱ्यांच्या जीवावर !
मागील दोन वर्षांपासून बेंबळा प्रकल्पाच्या अनेक तक्रारी दाखल आहेत. त्यावर कोणताही तोडगा काढला जात नाही. किंवा कसल्याही प्रकारची आर्थिक मदत सुद्धा मिळालेली नाही. चोपण येथील शेतकऱ्यांच्या शेतात शेतीचे पाणी घुसले होते. कोणाच्या शेतात जबरदस्तीने खोदकाम केले. तर कधी शेतमालकांसोबतच अरेरावी असे अनेक प्रकार घडले. यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. किंवा कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा:
रॉकेट्री: नबी इफेक्ट… सुजाता थिएटरमध्ये रिलिज, सत्य घटनेवर आधारीत
Comments are closed.