वणीतील पत्रकाराचा व समाजसेवकाचा मद्यधुंद अवस्थेत धुडगुस
मुकुटबन पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
विवेक तोटेवार, वणी: वणीतील एक पत्रकार व अडेगावातील एका सामाजिक कार्यकर्त्यासह आणखी तिघांवर मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्तेच अशा कृत्यात सापडल्याने परिसरात खमंग चर्चा रंगत आहे.
लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे मुकूटबन येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ पोलिसांनी फिक्स पॉईंट नेमलेले आहे. 11 एप्रिल रोज रात्री या फिक्स पॉइंटवर पोलीस कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान रुईकोट कडून वणीकडे स्विफ्ट कार (एम एच 29 एआर 0820) या पॉइंटवर आली. कार येताच पोलिसांनी कार थांबवून पाहणी केली असता कारमध्ये पाच तरुण आढळले.
त्यात वणी येथील एका मराठी वृत्तपत्राचे पत्रकार निलेश चौधरी अडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश पाचभाई, दृष्यंत काटकर, राहुल ठाकूर व बबलू खान होते. त्यांना थांबवून विचारपूस केली असता ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय पोलिसांना आला.
पत्रकाराची पोलिसांशी अरेरावी
गाडीमध्ये पाच लोक असल्याने पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता त्यातील नीलेश चौधरी या तरुणाने मी पत्रकार आहो तुम्हाला काय करायचे ते करा, शिवाय जी कार्यवाही करायची असेल ते करा असे उद्धट उत्तर देत अरेरावीची भाषा केली. यावरून महिला पोलीस रंजना सोयाम हिने फिर्याद दिली व पोलिसांनी कारसह पाचही तरुणांना पोलीस स्टेशन मध्ये आणले.
पत्रकार व समाजसेवकाने ढोसली होती दारू
पोलिसांनी पाचही तरुणांचे मेडिकल चेकअप केले असता त्यातील दुष्यंत काटकर व्यतिरिक्त चारही तरुणांनी दारू ढोसली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वरील पाचही आरोपीविरोधात जमावबंदी आदेशाचे उलंघन केल्या प्रकरणी तसेच संसर्ग पसरविण्याची शक्यता व दारूबंदी कायदा अंतर्गत भादंवि कलम १८८, २६९, २७१ तर ३७, १३५, ८५ अंतर्गत गुन्हे दाखल करून स्विफ्ट कार जप्त केली आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये याकरिता शासनाने गाईडलाईन दिली आहे. जनतेनी जमाव करू नये सोशल डिस्टन्सिंग ठेवावे यासारख्या सूचना वेळोवेळी प्रशासनाकडून दिल्या जात होत्या. परंतु याच आदेशाचे सर्रास उल्लंघन करणारे हे समाजसेवक व समाजात प्रतिष्ठा ठेवणारे पत्रकारच निघल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. महत्त्वाचं म्हणजे यातील आरोपी स्वत: दिवसभर घराबाहेर पडू नका असे उपदेशाचे डोस इतरांना देत असल्याची माहिती मिळत आहे.
वणीतील पत्रकार मुकुटबन परिसरात कसा?
या प्रकरणातील चार आरोपी हे मद्यधुंद अवस्थेत आढळले. सध्या लॉकडाऊन असल्याने राज्यभरात दारूबंदी आहे. असे असताना या लोकांना दारू मिळाली कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय संचारबंदी असल्याने कुणालाही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. असे असताना वणीतील एक पत्रकार, एक सामाजिक कार्यकर्ता व आणखी तीन लोक मुकुटबन परिसरात एकत्र येतात. पाचही लोक मुक्तसंचार करत फिरतात. इतक्या रात्री हे कोणत्या कामासाठी फिरायला गेले? याविषयी खमंग चर्चा रंगत आहे.