नांदेडचे धर्माधिकारी झालेत अचलपूरचे शेवाळकर

आज श्रीमद् रामकृष्णानंद महाराज शेवाळकर यांची पुण्यतिथी

0
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: नांदेड जिल्ह्यातील शेवाळा येथील धर्माधिकारी परिवार. याच परिवारात एका सत्पुरुषाचा जन्म झाला, नाव रामचंद्र. पुढे ते रामशास्त्री आणि संन्यास घेतल्यानंतर श्रीमद् रामकृष्णानंद महाराज म्हणून ओळखले जाऊ लागलेत. श्रावण शुद्ध एकादशीला सन 1840मध्ये त्यांनी आपला देह ठेवला. धर्माधिकारी हे त्यांचं उपनाम आपण त्याला आडनाव म्हणू शकतो. हे शेवाळकर धर्माधिकारी अचलपूरकर कसे झालेत याची एक रंजक हकिकत आहे. ही माहिती शेवाळकर यांचे निकटवर्तीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव उपाख्य बाळ सरपटवार यांनी दिली.

एकदा नांदेडला गोदावरी नदीच्या तिरावर रामशास्त्री यांचा भागवत सप्ताह सुरू होता. तेव्हा अचलपूरचे देशपांडे हे गोदापरिक्रमा करीत होते. दरम्यान देशपांडे यांनी महाराजांची अमृतवाणी ऐकली. एवढा मोठा सत्पुरुष आपल्या गावात असावा असे त्यांना वाटले. संतसंगाची इच्छा त्यांच्या मनात प्रकट झाली. त्यांनी रामशास्त्री यांना अचलपूरला स्थायिक होण्याची विनंती केली. त्यांना घर, शेती आणि गाय देऊ केली. देशपांडे यांच्या विनंतीनुसार महाराज अचलपूरला स्थायिक झालेत.

महाराज विविध विषयांचे प्रकांड पंडित होते. अध्ययन आणि हितोपदेश हा त्यांचा नित्याचा भाग होता. सुमारे 100 ते 150 वषांपूर्वीदेखील त्यांनी कधी जातीभेद पाळला नाही. सर्वांना मानवतेच्या समान पातळीवर ते पाहत असत. बोलण्या-वागण्यातील प्रेम, करुणा आणि सेवाभाव त्यांनी सदैव जपला. त्यामुळेच केवळ पंचक्रोशीतच नव्हेे, तर विविध भागांत त्यांची ख्याती पोहचली होती. त्यांना आयुर्वेद आणि ज्योतिष्य यांचं ज्ञान होतं. रामशास्त्री महाराज यांचा हरिवंश आर्याेषधी कारखाना होता.

त्याचा उपयोग ते लोककल्याणासाठी करीत. सर्वांनाच त्यांच्या आरोग्यसेवेचा लाभ होत असे. ही बाब तत्कालीन वर्णव्यवस्था पाळणाऱ्यांना खटकली. त्यांनी त्यांच्यावर ग्रामण्य लादले, म्हणजेच सामाजिक बहिष्कार टाकला. एवढंच नव्हे तर त्यांच्या विरोधात विविध खटाटोप सुरू केलेत.

अमरावतीला एकदा शृंगेरी पिठाचे शंकाराचार्य आले होते. त्यांच्याजवळ या लोकांनी रामकृष्णानंद महाराज यांची तक्रार केली. शंकराचार्यांच्या कोर्टात रामकृष्णानंद महाराज यांना उभे केले. महाराजांनी विविध ग्रंथांचे दाखले दिलेत. आपली बाजू तर्कसंगतदृष्ट्या मांडली. विषय अधिक स्पष्ट करून सांगितला. त्यांचा प्रतिवाद शंकराचार्यांना पटला. महाराजांच्या ज्ञानाने ते प्रभावित झालेत. त्यांना ग्रामण्यातून म्हणजेच बहिष्कारातून मुक्त केले.

हे बघून विरोधकांसह सर्वांचेच डोळे विस्फारलेत. याहीपलीकडे एक मोठी गोष्ट याच प्रकरणातून घडली. रामशास्त्री महाराज यांना वऱ्हाड आणि खानदेश प्रांतातील धर्मनिर्णय करण्याचे अधिकारपत्र दिले. त्यांच्या हाती मठाचा अधिकारदंड सोपविण्यात आला. रामशास्त्री महाराज यांचा निर्णय म्हणजे पीठाचा निर्णय झाला होता.

साहित्यिक आणि वक्ते प्राचार्य राम शेवाळकर हे रामकृष्णानंद महाराज यांचे पणतू. यांनी ‘पाणीयावरी मकरी’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यात ते आपल्या कुळाचा इतिहास मांडतात. गोविंदशास्त्री आणि गंगाबाई यांच्या पोटी रामच्रंद यांचा जन्म झाला. नांदेड येथे त्यांनी शिक्षण घेतले. पुढे रामानंद महाराजांशी त्यांची भेट झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचं जानकीसोबत लग्न झालं.

विविध ग्रंथांचे, आयुर्वेद, ज्योतिष्य यांचे ते ज्ञानी होते. त्यामुळे त्यांना लोक रामशास्त्री किंवा रामशास्त्री महाराज म्हणू लागलेत. बाळ गंगाधर टिळकांचे सहकारी दादासाहेब खापर्डे हे तेव्हा अचलपूरला राहत. पूर्वी अचलपूरला एलिचपूर म्हणत. यालाच लागून जुळे शहर परतवाडा आजही आहे. खापर्डे परिवार महाराजांच्या नित्य सानिध्यात असायचा. नेहमीच भेटीगाठी घडत. माधानचे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचाही महाराजांसोबत संपर्क असायचा.

प्राचार्य राम शेवाळकरांना रामकृष्णानंद महाराज यांचे काही संशोधनाचे मोडीलिपीतले टिपण सापडलेत. त्यांनी ते हैद्राबाद विद्यापीठाच्या संषोधन विभागकडे सुपूर्द केलेत. ज्योतिष्यषास्त्राचा त्यांचा अभ्यास होता. अमरावतीचा खापर्डे परिवार, अचलपूरचे तत्कालीन नवाब यांपासून सामान्यजनही ज्योतिष्यविषयक मदत रामकृष्णानंद महाराज यांच्याकडून घेत.

महाराज हे संस्कृत आणि मराठीतले चांगले कवी आणि गीतकार होते. त्यांच्या संस्कृतमधील 18 आणि मराठीतील 48 पद्यरचना ‘संचित’ या संग्रहात प्रकाशित झाल्यात. या संग्रहात आरती, अष्टके आणि अन्य पदं आहेत. महाराजांनी गणपती, मल्हारी, त्रिपुरसुंदरी, सविता, सावित्री, मंगळागौरी, गंगा, महालक्ष्मी, श्रीकृष्ण, दत्त, हनुमान, नारायण आदींवर पदं रचलीत.

त्यातही कोकिळेवर लिहिलेली आरती ही काव्याच्या दृष्टिेनेदेखील महत्त्वाची आहे. वडील गोविंदेश्वर यांसह श्री मुखाजी महाराज, पूर्णानंद महाराज, तुकामाई म्हणजेच तुकाराम महाराज येहळेगावकर, साधू महाराज कंधारकर यांच्यावरही आरती आणि अष्टके लिहिलीत. महाराज हे श्री चिन्मयानंद परंपरेतले होते. त्यांचीही आरती त्यांनी लिहिली. त्यात आदिनाथांपासून पूर्णानंदांपर्यतच्या एकूण 20 संतांचा समावेश आहे.

आयुष्याच्या अखेरार्धात त्यांनी सन्यासाश्रम स्वीकारला. रामचंद्र अथवा रामशास्त्री या नावाचा त्याग केला. त्यांनी ‘रामकृष्णानंद स्वामी’ हे नाव धारण केलं. अखेरपर्यंत ज्ञानार्जन, लोकसेवा आणि हितोपदेशाचं व्रत त्यांनी सांभाळलं. आपल्या नातवाचं म्हणजेच कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकरांचं ते कीर्तन ऐकत होते.

तो दिवस होता इसवीसन 1919मधील  श्रावण शुद्ध एकादशी. याच दिवशी त्यांनी आपला देह ठेवला. त्यांना आयुष्यात विपरित परिस्थितींचा सामना करावा लागला. संघर्ष करावा लागला. तरीदेखील त्यांनी मानवीकल्याणाचं कार्य सुरूच ठेवलं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
Attachments area
Leave A Reply

Your email address will not be published.