वणी येथील ‘त्या’ दोन्ही धान्य व्यापाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे 1 कोटी 15 लाख थकविले... व्यापाऱ्यांचे अटकपूर्व जामीनचे प्रयत्न निष्फळ

विवेक तोटेवार, वणी: येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून चुकारे थकविल्या प्रकरणी व्यापाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरज अमरचंद सुराणा व रुपेश नवरतनमल कोचर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार वर्धमान ट्रेडिंग कम्पनीचे मालक धीरज अमरचंद सुराणा यांनी 5 ते 11 जानेवारी 2022 दरम्यान 144 शेतकऱ्यांकडून 1935 क्विंटल सोयाबीन खरेदी केली. मात्र 5 दिवस उलटून ही शेतकऱ्यांना चुकारे दिले नाही.

शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या सोयाबीनचा चुकारा मिळणेकरिता बाजार समितीकडे तगादा लावला. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने 17 जानेवारी रोजी सदर व्यापाऱ्याला खरेदी केलेल्या 1935 क्विंटल सोयाबीनच्या किमतीसह, बाजार फी, अडत, सुपरव्हीजन फी असे एकूण 1 कोटी 15 लाख 26 हजार 46 रुपये त्वरित जमा करण्याची नोटीस बजावली. नोटिसमध्ये 3 दिवसात सर्व रक्कम भरणा केल्याची सूचना केली. परंतु खरेदीदार धीरज सुराणा यांनी बाजार समितीच्या नोटिसची दखल घेतली नाही.

त्यानंतर बाजार समितीने 21जानेवारीला दुसरी नोटीस देऊन 24 तासात रक्कम देण्याची किंवा लेखी उत्तर देण्याची सूचना केली. परंतु त्यांनी या नोटीसचेही उत्तर दिले नाही. अखेर बाजार समिती सचिव अशोक झाडे यांनी 24 जानेवारीला वणी पोलीस ठाण्यात वर्धमान ट्रेडिंग कंपनीचे संचालक धीरज अमरचंद सुराणा व जमानतदार रुपेश नवरतनमल कोचर दोघ रा. वणी विरुद्द फसवणुकीची तक्रार दिली.

शेतकऱ्यांचे बयान व प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी तब्बल 1 महिन्यानंतर 28 फेब्रुवारीला दोघांविरुद्ध कलम 406, 420, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला. व्यापारी धीरज सुराणा 24 जानेवारी पासूनच फरार असून अटकपूर्व जामीन मिळण्याची धडपड सुरु होती. मात्र अद्याप न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झाली नसल्याची माहिती आहे. घटनेचा तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

चुकारा मिळवून देण्याची जबाबदारी आमची-झाडे
शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम त्यांना मिळणार आहे. कायदेशीर कार्यवाहीमुळे उशिरा का होईना, त्यांचा पूर्ण चुकारा मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची आहे.
– अशोक काशीनाथ झाडे
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

बाजार समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!
केंद्र शासनाच्या ई-नाम (National Agriculture Market) योजनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खरेदी केलेल्या मालाची संपूर्ण रक्कम 24 तासाच्या आत बाजार समितीच्या बँक खात्यात भरणा करणे गरजेचे आहे. मात्र सदर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाची रक्कम जमा न करता बाजार समितीने पुढील 4 दिवस व्यापाऱ्याची खरेदी सुरु का ठेवली ? बाजार समितिकडुन व्यापाऱ्यांना दिलेल्या बेकायदेशीर सवलतीचा गैरवापर सदर व्यापाऱ्यांनी केला. यापूर्वीही काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची घटना घडल्या आहेत.

Comments are closed.