अखेर मारहाण प्रकरणी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: आपचा तालुका संयोजक असलेल्या निखिल ढुरके याल लोखंडी रॉडने चार जणांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा सूत्रधार असलेल्या एका राजकीय पदाधिका-याचे नाव आरोपींच्या यादीत न टाकल्याने पोलीस ठाण्यात वाद निर्माण झाला होता. मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करत निखिलने गुरुवारी अमरावती येथे जाऊन पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अखेर या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या काँग्रेसच्या पदाधिका-यासह 6 जणांवर भादंवि व ऍट्रोसिटीच्या कलमांन्वये विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. 

तक्रारी नुसार, निखिल धर्मा ढुरके (25) हा वणीतील रंगनाथ नगर येथील रहिवासी असून तो शहरातील एका महाविद्यालयात एमएचे शिक्षण घेत आहे. तो राजकारणातही सक्रीय असून आम आदमी पक्षाच्या तालुका संयोजन पदावर आहे. निखिलने दोन ते तीन महिन्याआधी शहरातील अवैधरित्या सुरू असलेला मटका जुगार बंद करण्यासाठी तक्रार दिली होती.

बुधवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास निखिल व त्याचा मित्र शेख जलील शेख फरिद यांनी दीपक चौपाटी जवळील एका कॅन्टीनवर चहा पिले. त्याचा मित्र हा दुचाकी काढून निघून गेला तर निखिल दुचाकी काढत असता तिथे एका ग्रे रंगाच्या स्कुटीवर असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28) हे दोन तरुण आले. त्यांच्या हातात पेपरमध्ये लोखंडी रॉड होता.

इजहार भाईचे पंगा लेगा तो मार डालुंगा असे म्हणत त्यांनी त्याच्या जवळील लोखंडी रॉड काढून निखिलला रॉडने मारण्यास सुरवात केली. त्याचवेळी आणखी तिघे जण तिथे आले. त्यातील एकाचे नाव ताहीर शेख रफीख शेख (28), दुसरा अल्ताफ चिरी (27) तर तिसरा अज्ञात (वय अंदाजे 50) तोंडावर स्कार्फ बांधला होता. त्यानंतर चौघांनी मिळून निखिलला रॉडने बेदम मारहाण केली. तर स्कार्फ बांधलेला त्यांच्या सोबत उभा होता.

मारेक-यांनी डोक्यावर रॉडने प्रहार केल्याने निखिलने डोक्यावर हात ठेवला. त्यामुळे त्याच्या हाताला जबर मारला. त्यांनी त्याच्या पायावरही रॉडने जोरदार प्रहार केले. मारहाण करून चौघांनी निखिलला कॅन्टीन समोरून चौपाटीच्या चौकात नेले. दरम्यान निखिलने 112 क्रमांकावर पोलिसांना कॉल केला. त्यामुळे मारहाण करणारे पळून गेले. हे सर्व माणसं हजहार ग्यासुद्दीन शेख (45) याचे असल्याचा आरोप निखिलने केला आहे.

मारहाणीला वादाची पार्श्वभूमी
इजहार ग्यासुद्दीन शेख हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आहे. त्याचे नगर पालिकेच्या अगदी जवळ असलेल्या आरोग्य विभागाच्या बाजूला कार्यालय आहे. सदर कार्यालय हे अतिक्रमण करून बांधलेले आहे. हा गाळा काढण्यासंबंधी निखिलने माहितीच्या अधिकारात पालिकेला माहिती मागितली होती. त्यावेळी इजहारने निखिलला माझा ब्लॉक हटवण्याच्या प्रयत्न केल्यास मुलं पाठवून मारेल अशी धमकी दिली होती. तसेच त्याच्या आईला कॉल करूनही त्याने तुझ्या मुलाला समजावून सांग अशी धमकी दिली होती.

मारहाण झाल्यानंतर निखिलने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. त्यांनी निखिलला ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला एक्स रे काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते एका खासगी रुग्णालयात गेले. तिथे एक्स रे काढला असता त्याचा डावा हात व उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाल्याचा रिपोर्ट आला. तिथून निखिलने मित्रांसह पोलीस स्टेशन गाठले. मात्र तिथे तक्रारीत आरोपींमध्ये इजहार याचे नाव टाकण्यावरून वाद झाला. त्यामुळे निखिलने अमरावती गाठत पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली. अखेर या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी इजहार ग्यासुद्दीन शेख (45), असलम अब्बास पठाण (27) व वसीम शेख (28), शेख रफीख शेख (28), अल्ताफ चिरी (27) व एक अनोळखी इसम (वय अंदाजे 50) अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भांदविच्या कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 506, 109 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3 (2) (VA), 3 (2), 3 (V), 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार अजीत जाधव यांनी या प्रकरणी कोणत्याही आरोपींना सोडणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर त्यांनी त्यांचा शब्द पाळत आरोपींवर कठोर कारवाई केली. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव करीत आहे.

Comments are closed.