बँक संचालक असलेल्या कंत्राटदारावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बनावट एफडीआर देऊन केली होती शासनाची दिशाभूल, कंत्राटदाराचे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पद धोक्यात

जितेंद्र कोठारी, वणी : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे चक्क 18 लाखाचे बनावट मुदत ठेव पावत्या (FDR) जमा करुन शासनाची दिशाभूल करणाऱ्या कंत्राटदारावर अखेर 4 महिन्यानंतर पाटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राजीव मल्लारेड्डी येल्टीवार, रा. दिग्रस, ता. झरी जि. यवतमाळ असे कंत्राटदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे ज्या बँकेची बनावट FDR त्यांनी जि. प. बांधकाम विभागाकडे जमा केली त्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालकही आहे.

जि. प. बांधकाम विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता यांच्यातर्फे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद पुंडलिकराव राऊत यांनी गुरुवार 23 जुन रोजी पाटण पोलीस स्टेशनमध्ये वरील तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पाटण पोलिसांनी आरोपी कंत्राटदार राजीव मल्लारेड्डी येल्टीवार, रा. दिग्रस, ता. झरी जि. यवतमाळ विरुद्ध कलम 420, 467, 468 भादवि अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

य.जि. म.स. बँकेच्या पाटण शाखेचे 16 FDR बनावट असल्याचे उघड झाल्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रधान सचिव सहकार विभाग महाराष्ट्र राज्य व सहकार आयुक्त पुणे याना लेखी तक्रार करून राजीव येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु राजकीय दबावामुळे सहकार विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीव येल्टीवार यांचे मध्यवर्ती बँक संचालक पद धोक्यात आले आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!