वेगाव येथे गोठ्याला आग… गो-हा भाजला तर शेतीचे साहित्य, दुचाकी जळून खाक

मध्यरात्री चालले आगीचे तांडव, शेतकऱ्याचे सुमारे 2 लाखाचे नुकसान

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वेगाव येथे एका घरातील गोठ्याला रात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एक गो-हा भाजला तर बाईक, शेतीचे साहित्य व अवजारे, चारा इ. जळून खाक झाला. ही आग इतकी रौद्र होती की गोठ्यातील आगीने घराला देखील कवेत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने व घरात ठेवलेल्या कापसाला आग न लागल्याने मोठा अनर्थ टळला. या आगीत शेतक-याचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली आहे. 

शेतकरी उमेश लक्ष्मण कापसे हे वेगाव येथील रहिवासी आहे. यांच्या घराला लागूनच जनावरे बांधण्याचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये त्यांचे जनावरे असायची. यात एक गाय, गोऱ्हा, कालवड यासह जनावरांचा चारा, शेतीसाठी लागणारे साहित्य, टू व्हीलर सुद्धा त्याच गोठ्यामध्ये ठेवलेली होती. गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते शेतामधून घरी परत आले. त्यांच्या गोठ्यातच एक चूल आहे. तिथे त्यांनी आंघोळीसाठी गरम पाणी केले. पाणी गरम झाल्यावर त्यांनी विस्तव विझवला. त्यानंतर ते रात्री जेवण करून झोपी गेले.

रात्री 12 वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. आग लागताच गाय आणि कालवड दावे तोडून बाहेर पडले. पण त्या गोठ्यामध्ये असलेली टू व्हीलर, जनावरांचा चारा, कुटार जळले. या आगीत एक गोऱ्हा भाजला गेला. या आगीने एवढं रौद्र धारण केलं की आग गोठ्यातून त्यांच्या घराला देखील लागली. त्यांच्या घरातील सोफा जळायला लागला. सोफा जळाल्यामुळे घरात धूर झाला. त्यांनी उठून बघितले असता त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी घरातील सोफाच घराबाहेर फेकला. त्यानंतर त्यांनी तातडीने घरातील सिलिंडर सुद्धा बाहेर लागले.

 

कापूस वाचला आणि अनर्थ टळला
गोठ्याला आग लागल्याचे लगेच शेजा-यांना कळले. त्यामुळे अनेक लोक मदतीसाठी समोर आले. त्यांनी आग विझवण्यास मदत केल्याने आगीवर लवकर नियंत्रण आणण्यास आले. त्यामुळे आग कापसापर्यंत आग पोहोचली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग विझवताना घरमालक उमेश कापसे यांच्या हातालाही जखम झाली. 

गोठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुशी आहेत. घरमालकांनी संध्याकाळी गोठ्यात पाणी गरम केले होते. त्यानंतर त्यांनी आग विझवली. मात्र घुशीमुळे ही आग गोठ्यात पोहोचली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत कापसे यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हे देखील वाचा: 

एक्स गर्लफ्रेंडच्या घरासमोर मजनूचा रात्री धिंगाणा

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.