पंचायत समिती कार्यालयातअग्नितांडव निमित्याने अनेक प्रश्न उपस्थित..!

सर्व शासकीय कार्यालयात आग प्रतिबंधक उपाययोजना नियमांना तिलांजली, दोन दिवसांपूर्वी मनसेनी केली होती फायर ऑडिट करण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी रात्री 8.30 वाजता पंचायत समितीच्या उमेद अभियान कार्यालयात घडलेल्या भयंकर अग्नितांडव निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. तालुका व्यवस्थापन, पशुसंवर्धन व बचत गटाचे संपूर्ण दस्तावेज असलेल्या या कक्षात आग शॉर्टसर्किटमुळे लागली की कोणी लावली ? हे चौकशीनंतर समोर येईलच. मात्र सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, सार्वजनिक वापराच्या इमारतीमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्याचे शासन नियमांना तिलांजली देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही होणार का ? असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

वणी शहराची लोकसंख्या लाखोच्या घरात पोहोचली आहे़. शहरात दिवसेंदिवस नागरी वसाहत व वाणीज्यक संकुलाची संख्या वाढत चालली आहे़. तालुका मुख्यालय असल्यामुळे शहरात अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांची इमारती येथे आहेत़. त्याचप्रमाणे सार्वजनिक वापरात येणारे दवाखाने, सभागृह, लॉन, लॉज, विश्रामगृह, सार्वजनिक वाचनालये, शाळा, महाविद्यालये, कारखाने व लहान मोठे उद्योगाचे गोडावून आहेत़. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 अंतर्गत सर्व इमारतीमध्ये आगीपासून होणाऱ्या दुर्दैवी घटनापासून आळा घालण्यासाठी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे़. 

नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार शासकीय, निमशासकीय संस्था व सार्वजनिक उपक्रमाच्या कार्यालयाच्या अग्नीसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण अग्निशमन सेवा विभागाचे संचालक याच्याकडून नोंदणीकृत केलेले अनुज्ञाप्तीधारक संस्थेकडून करणे गरजेचे आहे़. मात्र याकडे अधिकाऱ्यासह व्यावसायिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. शहरातील एकाही शासकीय कार्यालयाच्या इमारतीत तसेच सार्वजनिक संस्थेच्या कार्यालयात उपाययोजना करण्यात आली नाही़. त्यामुळे सर्व कार्यालय अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजनेपासून असुरक्षित आहेत़.

मनसेनी केली होती फायर ऑडिटची मागणी

उन्हाळ्यात आगीच्या घटनेत होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील सर्व शासकीय व खाजगी कार्यालय, दवाखाने, शैक्षणिक संस्था, हॉटेल, लॉज, सभागृह, मंगलकार्यालय यांची वार्षिक फायर ऑडिट करण्याची मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले होते.

आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी

पंचायत समिती कार्यालयात लागलेली आगीची घटना दुर्देवी आहे. तालुका व्यवस्थापन, पशुसंवर्धन व उमेद अभियानाचे सर्व कामकाज या कक्षातून सुरु होते. आगीची घटनेत संगणक व महत्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती आहे. कार्यालयात आग कशामुळे लागली, याची सखोल चौकशीची गरज आहे. शासकीय कार्यालयात अग्निशामक उपाययोजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.

राजू उंबरकर- प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.