घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव, 6 दुकाने जळून खाक

सकाळी आग आटोक्यात.... दुकानदारांचे लाखोंचे नुकसान...

वणी बहुगुणी डेस्क: घोन्सा येथे मध्यरात्री आगीचे तांडव पाहायला मिळाले. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घोन्सा येथील बस स्टँड परिसरातील दुकानाला भीषण आग लागली. या आगीत 6 दुकाने जळून खाक झालीत. यात ईलेक्ट्रिक दुकान, बुट हाऊस, पानटपरी, चहा कॅन्टीन, भांड्याचे दुकान, हेअर सलून याचा समावेश आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत दुकान मालकांचे 22.50 लाखांचे नुकसान झाले आहेत. यात सर्वाधिक 15 लाख रुपये नुकसान हे आकाश ईलेक्ट्रीकल्सचे झाले आहेत.

प्राप्त माहिती नुसार, सोमवारच्या मध्यरात्री (14 नोव्हेंबर) 2.30 वाजताच्या सुमारास पान टपरीच्या वरील भागाने पेट घेतल्याचे गावातील नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने जवळपासच्या घरातील नागरिकांना उठवून याची माहिती दिली. पानटपरीवरून ही आग शेजारी असलेल्या नचिकेत बुट हाऊस दुकानात पोहोचली. दुकानाबाहेर ठेवलेल्या चपलेच्या रॅकने तात्काळ पेट घेतला व शेजारी असलेल्या आकाश ईलेक्ट्रीकल्स या दुकानात आग पसरली. पुढे अवघ्या काळी वेळातच आगीने आजूबाजूच्या दुकानाला कवेत घेतले. लोकांनी घटनास्थळी धाव घेत पर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते.

गावक-यांनी पाण्याचा पाईप लावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीचे रौद्र रुप बघून शेजारील दुकानदारांनी दुकानातील माल त्वरित बाहेर काढला. दरम्यान याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. 3.30 वाजताच्या दरम्यान अग्निशमन दलाची गाडी घोन्सा येथे पोहोचली. त्यांनी अथक प्रयत्नांनी आग विझवली. ही आग इतकी भीषण होती की सकाळी 6 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली.

या आगीत दुकानचालक रमेश काकडे यांचे बुट हाऊस (नुकसान 3 लाख रुपये), विठ्ठल आस्कर यांचे ईलेक्ट्रिकचे दुकान (नुकसान 15 लाख), अनुप येसेकर यांचे हेअर सलून (नुकसान 2 लाख), गजानन गावंडे यांचे स्टिल भांड्याचे दुकान (नुकसान 2 लाख), अरुण सिडाम यांची पानटपरी (50 हजार), सुरेश मांढरे यांची चहा कँन्टीन (10 हजार रुपये) जळाली. आगीत सर्वाधिक नुकसान ईलेक्ट्रीकच्या दुकानाचे झाले. आग लागल्याचे कळताच संपूर्ण गाव घटनास्थळी गोळा झाले होते. घटनेची माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास वणी येथील तहसिलदार व मुकुटबन पोलीस स्टेशनची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पानटपरीवरून जाणा-या ईलेक्ट्रीकच्या तारातून झालेल्या स्पार्किंगमधून किंवा फटाक्यामुळे आग लागल्याचा अंदाज बांधला जात आहे. आग विझवण्यास फायर फायटर दिपक वाघमारे, शाम तांबे, रितेश गौतम आणि वाहन चालक देविदास जाधव यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे शुक्रवारी दुपारी वणी येथील एका घरी सिलिंडरने पेट घेतला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी ही घटना घडली.

Comments are closed.