पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट

सामाजिक संघटना व सर्वसामान्यांचीही पूरग्रस्तांना मदत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे. तर मारेगाव तालुक्यात चिंचमंडळ, शिवणी, वेगाव इत्यादी गाव पुरामुळे प्रभावित झाले आहे. दरम्यान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, संजय देरकर, विजय पिदूरकर यांनी पूरग्रस्त भागातील पाहणी केली. तर मारेगाव तालुक्यात राजू उंबरकर यांनी पूरग्रस्त गावाची भेट घेतली. दरम्यान सर्वसामान्य लोकही पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले असून जेवण आणि इतर व्यवस्था ते करताना दिसत आहे.

सध्या वर्धा नदीच्या काठावरील कोना व झोला गावातील लोकांना सावर्ला येथे रेस्क्यू करण्यात आले आहे. दरम्यान संजय देरकर व किरण देरकर यांनी सावर्ला येथे धाव घेतली व पाचशे लोकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यानंतर त्यांनी उकणी, मंगोली गावात जाऊन पूरग्रस्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले. सदर शिबिर हे डॉ. विलास बोबडे, लोकेश बोबडे, सरपंच विठ्ठल बोडे यांच्या मदतीने करण्यात आले. यावेळी पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून औषध वाटप करण्यात आले.

पूरग्रस्तांना जेवण वाढताना किरण देरकर

दुपारी विजय चोरडिया यांनी सहका-यांसह पूरग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी कुठलीही मदत लागल्यास कळवा असे आवाहन केले. तसेच पुराचा वेढा असलेल्या गावात जी आवश्यक सेवा, जेवण किंवा इतर कोणती मदत हवी असल्यास तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले. तर विजय पिदूरकर यांनी सावंगी, जुगाद, कवडशी इत्यादी पूरग्रस्त गावांचा दौरा करत पूरग्रस्तांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना विजय चोरडिया

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मंगळवारी मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील सर्व मनसैनिकाना पुरग्रस्तांची मदत करण्याचे आदेश दिले. तसेच ते स्वतः वणी, मारेगाव येथील पूर परिस्थिती वर लक्ष ठेवून असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सर्वसामान्यांचाही मदतीचा ओघ सुरू
अनेक सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य लोकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याद्वारे आज पूरग्रस्त गावात टिफिन पाठवण्यात आले. तर काही लोकांनी बिस्किट, ब्रेड, फरसान इत्यादींचे पार्सल पूरग्रस्त गावात पाठवले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.